घरताज्या घडामोडीप्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Subscribe

मुंबई – राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. याशिवाय गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सी प्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि मान्यवरांसह संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली. राज्यात एकूण १५ विमानतळे असून २८ धावपट्ट्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात आल्याचे कपूर यांनी बैठकीत सांगितले.

विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच राज्यात असलेल्या धावपट्ट्यांचेही विस्तारीकरण आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे. त्यासाठी जागांची निश्चिती करावी. गंभीर रुग्णाला एअरलिफ्ट करण्याकरिता वैद्यकीय मदतीसाठीदेखील हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

पर्यटनदृष्ठ्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी या भागात सी प्लेन सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी अमरावती, शिर्डी, गोंदिया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबत चर्चा करण्यात आली.


हेही वाचा : सीमा प्रश्नासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई ३ डिसेंबरला बेळगावला जाणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -