घरआतल्या बातम्याराज-उद्धव यांच्यात चर्चा, मनोरंजन क्षेत्रातही होणार Bio Bubble चा प्रयोग

राज-उद्धव यांच्यात चर्चा, मनोरंजन क्षेत्रातही होणार Bio Bubble चा प्रयोग

Subscribe

आयपीएल क्रिकेटसाठी उपयोगात आणलेला ‘बायो-बबल’ प्रयोग आता मनोरंजन क्षेत्रासाठी करण्याचा विचार ठाकरे सरकारने सुरू केला आहे. सरकार या विचाराप्रत येण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आणि पुढाकार महत्वाचा ठरला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून त्यामुळे हजारो कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

कोरोनाचे आगमन भारतात आल्यापासून मनोरंजन क्षेत्राला त्याचा मोठा फटका बसला. लाखो कलाकार-तंत्रज्ञांना बेकारीचा सामना करावा लागत आहे. चित्रपट, नाटक, वाद्यवृंद आणि मालिका ह्यातील सगळ्याच कलाकारांना काम बंद असल्याने जगायचे कसे या समस्येने ग्रासलंय. त्यामुळे अशा कलाकारांनी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाणांसह अनेक नेत्यांकडे कैफियत मांडली. मात्र, सगळ्यांनीच मुख्यमंत्री ठाकरेंच्या कोर्टात चेंडू टोलवला. त्यानंतर मात्र निराश झालेल्या या कलाकार-निर्मात्यांपैकी मंडळींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दूरसंवाद प्रणाली (झूम)द्वारे साकडे घातले. राज ठाकरे यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी या कलाकारांच्या वेदना समजून घेतल्या. यासाठी मनसे नेते अभिजीत पानसे आणि मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी पुढाकार घेतला. या बैठकीत अभिनेते- निर्माते महेश मांजरेकर, केदार शिंदे, अभिजीत पानसे, विजू माने, अमेय खोपकर यांच्यासह सोनाली कुलकर्णी, श्वेता शिंदे, सई ताम्हणकर, पुष्कर क्षोत्री, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, मृणाल कुलकर्णी, संगीतकार कौशल इनामदार, राहुल रानडे, सिनेसमीक्षक अमोल परचुरे यांनी सहभाग घेतला होता.

- Advertisement -

गुरुवारी झालेल्या दोन तासांच्या मंथनानंतर राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावून मनोरंजन क्षेत्रातील समस्यांचा आणि हजारो छोट्या कलाकारांच्या समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर या दोन्ही उभय नेत्यांनी केलेल्या चर्चेनुसार आयपीएल प्रमाणेच मनोरंजन क्षेत्रासाठी ‘बायो-बबल’ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपली प्राथमिक मंजूरी दिली असल्याचे विश्वसनीयरित्या समजतेय.

या बायो-बबल प्रयोगामुळे मालिका क्षेत्राला जास्त फायदा होईल. कारण वर्षाला मराठीत सुमारे ४०-५० मराठी मालिकांची निर्मिती होते. पटकथेपासून अभिनय, एडिटिंग, वितरण आणि जाहिरात यांचा विचार केल्यास हजारो कुटुंबे यावर विसंबून आहेत. वर्षभरात चालणार्‍या मालिकांपैकी निम्म्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात तर एखादी किंवा दुसरी मालिकाच हिट होते. मालिकेच्या निर्मात्यांनी ‘बायो-बबल’ ने चित्रीकरण केल्यास होणारा खर्च वाढतो. मात्र, तो वाहिन्या निर्मात्यांना द्यायला तयार आहेत. बायो-बबलमध्ये सेट ते रिसॉर्ट या टप्प्यात कलाकारांचा बाह्यविश्वाशी संबंध येत नाही. सेटवरही सगळी खबरदारी घेऊनच चित्रीकरण करण्यात येते.

- Advertisement -

या ‘बायो-बबल’चा फायदा चित्रपटसृष्टीला होण्याची शक्यता कमी आहे. कारण चित्रीकरण होऊन तो एडिटिंग होऊन तयार झाला तरी प्रदर्शित होण्यासाठी सिनेमागृहे सुरू होईपर्यंत थांबावेच लागेल. वर्षाला साधारण १००च्या आसपास चित्रपटाची निर्मिती होते. त्यातले वीसेक चित्रपट आपला खर्च वसूल करतात तर एखादा दुसरा सुपर हिट होतो. मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी साधारण ४०० कोटींची उलाढाल होते.

नाट्यसृष्टीत दरवर्षी ४०/५० नाटकांची निर्मिती केली जाते. त्यात १०० पेक्षा जास्त प्रयोग करणार्‍या नाटकांची संख्या मोजकीच आहे. सध्या नाट्यगृह बंद असल्यामुळे नाट्यकर्मींवरही बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्या कर्मचार्‍यांना आता सरकार काय निर्णय घेते याचे वेध लागले आहेत. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या क्षेत्रात दरवर्षी १०००/१२०० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे राज-उद्धव यांची या क्षेत्रासाठी होणारे मनोमिलन खूपच महत्वाचे मानले जातेय.

राज ठाकरेंच्या या मनोरंजन क्षेत्राच्या पुढाकाराने हा प्रश्न सुटू शकतो असे सांगून निर्माते विजू माने म्हणाले, राज यांनी हा प्रश्न सोडवला तर आम्हा कलाकारांनाही जबाबदारीचे भान ठेवावे लागेल. राज-उद्धव यांनी संगनमताने हा निर्णय घेतला तर त्यातून आमच्या हजारो कुटुंबांच्या उपजिविकेचा प्रश्न सुटेल. ज्येष्ठ-कनिष्ठ हा भाग सोडून शुटिंगच्या स्थळी नियम पाळावे लागतील.

आयपीएलसाठी करण्यात आलेला बायो-बबलचा प्रयोग स्पर्धा अर्धी झाल्यानंतर गुंडाळण्यात आला होता. तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यावर स्पर्धा अर्धवट सोडून द्यावी लागली. अत्यंत कडेकोट व्यवस्थेनंतरही कोरोनाने आयपीएल खेळाडू ठेवलेल्या हॉटेलमध्ये शिरकाव केला होता. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील बायो-बबलही किती यशस्वी होईल याबाबत काही कलाकारांनी शंका व्यक्त केली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -