वचने मांडायची अन् वागायचे विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Establish joint committee to address demands of the cleaners
सफाई कामगारांच्या मागण्या सोडविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेरोशायरी करायची, संतवचने सांगायची आणि वागताना मात्र नेमके त्याच्या विरोधात वागायचे. सभागृहात हमरीतुमरीपर्यंत यायचे. हा संतांचा महाराष्ट्र आहे, परंपरासंपन्न महाराष्ट्र आहे. शड्डू ठोकायला विधिमंडळ सभागृह काही कुस्तीचा आखाडा नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विरोधी पक्ष भाजपला नाव न घेता लगावला.

सभागृहात बोलताना आपण काय बोलतो याचे भान ठेवलेच पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे पाहत असतो. याबाबत आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोललो असल्याचेही ठाकरे म्हणाले. अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे. हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी विधानभवनात ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी सभागृहातील विरोधी पक्ष भाजपच्या वर्तनाबद्दल नाराजी बोलून दाखवली. कालच राज्यातील शाळा सुरू झाल्या आणि आज आपला इथे वर्ग भरला… आजही आपण विद्यार्थीच आहोत. मी विधानपरिषदेचा आमदार असल्याने संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ म्हणून मला संपूर्ण राज्याचा विचार करावा लागतो, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

अर्थसंकल्पातील बाबी ठरल्याप्रमाणे अंमलात आणण्याची तसेच अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर नेमके बोलण्याची गरज आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक हे विधानमंडळाच्या अधिवेशनावर लक्ष ठेवून असतात याची जाणीव उपस्थितांना करून देत ठाकरे म्हणाले की, लोकप्रतिनिधींना मतदान करणारे मतदार विधानमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. मतदारसंघाचे किती प्रश्न सभागृहात मांडतात याकडे मतदारांचे लक्ष असते. त्यामुळे थोर परंपरा लाभलेल्या या सभागृहात बोलण्याची संधी मिळाली असताना सभागृहाचे कामकाज समजून घेवून आपल्याला मिळालेली ही उच्च परंपरा कशी जपता येईल याची प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.