जमावबंदी उल्लंघनामुळे प्रियंका गांधी यांना अटक

Priyanka Gandhi says do not expect any miracle from me

लखीमपूर खीरी येथील शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर तेथील शेतकर्‍यांच्या भेटीला निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सीतापूर येथील विश्रामगृहात ठेवण्यात आले असून तेथेच तात्पुरते जेल उभारून त्यांना बंदिस्त करण्यात आले आहे. त्यामुळे देशभरातील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून काँग्रेसचे अनेक नेते सीतापूरच्या दिशेने निघाले होते. मात्र, त्यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

सीतापूर येथील विश्राम गृहात प्रियंका गांधी यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सुमारे 36 तासांपासून त्या नजरकैदेत होत्या. त्यानंतर मंगळवारी प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधींनी जमावबंदीचे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियंकांवर युपी पोलिसांनी 36 तासांनी कारवाई केली आहे. प्रियंका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलीस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिले होते.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे रविवारी शेतकर्‍यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक झाला आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आले. यानंतर प्रियंका गांधी लगोलग पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघाल्या. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना लखीमपूरला जाण्यास मनाई करून त्यांना ताब्यात घेतले. गेल्या 36 तासांपासून त्या पोलिसांच्या ताब्यात होत्या.