घरठाणेमहापालिकेच्या माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य : आयुक्त अभिजीत बांगर

महापालिकेच्या माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य : आयुक्त अभिजीत बांगर

Subscribe

ठाणे महानगरपालिकेच्या सर्व माता बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर)कार्यान्वित करणे गरजेचे आहे. या सोबतच सर्व ठिकाणी फक्त इलेक्टिव्ह सिझेरियन नव्हे तर इमर्जन्सी सिझेरियनची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत असतानाच माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य असलीच पाहिजे, यासाठी अतिरिक्त स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञांची आवश्यकता असेल तर ते उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर आरोग्यकेंद्र व मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी ३१ जानेवारीला केली. आरोग्य केंद्रात स्त्रीरोगतज्ज्ञ व इतर डॉक्टरांची अनुपस्थिती,आरोग्यकेंद्राची दुरावस्था, आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आदी बाबी दिसून येताच याबाबत संबंधितांना जाब विचारत ठाणे महापालिकेच्या सर्व विभागातील आरोग्यकेंद्रात सेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांना पूर्णवेळ कार्यरत राहण्याचे निर्देश दिलेत. सर्व ठिकाणी रुग्णांना वेळेवर व नियमित उपचार मिळतील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

- Advertisement -

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गरीब व आर्थिक घटकातील नागरिकांना वेळेवर व मोफत  वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विभागनिहाय आरोग्यकेंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यापैकी शिवाजीनगर आरोग्य केंद्राची पाहणी आयुक्तांनी केली. यावेळी दैनंदिन सेवेत असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ दुपारी बारा वाजता दुसऱ्या आरोग्य केंद्रात गेल्याची बाब निदर्शनास आली. प्रसुतीगृहामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ पूर्ण वेळ उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत यासाठी संपूर्ण नियोजन करुन प्रसुतीगृहामध्ये व आरोग्यकेंद्रात डॉक्टरांची उपस्थिती पूर्णवेळ राहील यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

यावेळी संपूर्ण आरोग्य केंद्रातील सोनोग्राफी कक्ष, शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करीत असताना लॉबीमध्ये वापरात नसलेले बेडस् व इतर साहित्य तातडीने हटवून लॉबी तात्काळ मोकळी करण्यात यावी. तसेच सद्यस्थितीत आरोग्यकेंद्रातील ओपीडी ही पहिल्या मजल्यावर असून ती तळमजल्यावर करणेबाबत कार्यवाही करावी जेणेकरुन गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीस्कर होईल असेही त्यांनी नमूद केले. प्रसुतीगृहात नावनोंदणीसाठी येणाऱ्या गरोगर मातांची नोंदणी आठवड्यातून एक दिवस न करता दररोज सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे.

- Advertisement -

महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्र पूर्णवेळ चालू राहतील या दृष्टीने नियोजन करावे व या ठिकाणी उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवा जसे सोनोग्राफी सेंटर, आवश्यकतेप्रमाणे निवासी डॉक्टर्स, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच वैद्यकीय कर्मचारी यांची तातडीने पूर्तता करावी व नागरिकांचा विश्वास संपादन होईल या दृष्टीने रुग्णांना सेवा देण्याचे काम सातत्याने सुरू राहील याबाबत दक्ष राहून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आयुक्त बांगर यांनी दिले.

संपूर्ण आरोग्य केंद्रातील आवश्यक स्थापत्य कामे करुन उपलब्ध कक्ष नीटनेटके व स्वच्छ राहतील यासाठी देखील योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालयातील गळती काढणे, प्लास्टर, विद्युतीकरण आदी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधितांना यावेळी बांगर यांनी दिले.

शहर सौंदर्यीकरणाचा घेतला आयुक्तांनी आढावा

शहरात सुरू असलेली सौंदर्यीकरणाची कामे ही अंतिम टप्प्यात असून या कामाचा आढावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी मंगळवारी घेतला. शहरातील पादचारी पूल, सेवा रस्त्यालगत असलेली उद्याने, उड्डाणपुलाखालील दोन गर्डरमधील मोकळ्या जागेत विद्युत रोषणाई आदी उर्वरित कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. आनंदनगर येथील ठाण्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस दगडी दीपमाळा तयार करण्याचे काम सुरू आहे. या दीपमाळाचे उर्वरित काम व दीपमाळांना विद्युत रोषणाई करुन सदरचे काम हे १५ एप्रिलपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना बांगर यांनी यावेळी दिल्या. आकर्षक रंगसंगतीने आनंदनगर येथील फूटपाथ तयार केले असून रेलिंगलाही आकर्षक रंग देण्यात यावा जेणेकरुन या परिसराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल या दृष्टीने काम लवकरात लवकर करण्यात यावे असेही त्यांनी नमूद केले.

डेब्रीज हटविण्यासाठी विशेष पथके तयार करावीत

शहरातील रस्त्यांच्या कडेला ज्या-ज्या ठिकाणी डेब्रीज नजरेस पडेल ते तातडीने उचलले जावे यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या स्तरावर विशेष पथके तयार करुन त्या पथकाच्या माध्यमातून सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दोन शिफ्टमध्ये शहरभर गाड्या फिरत राहतील व डेब्रीज उचलले जाईल याचे नियोजन सुनिश्चित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

हरितपट्टयामधील झाडांची लागवड घनदाट पद्धतीने करावी

रस्त्याशेजारी विकसित करण्यात आलेल्या ट्री बेल्टमध्ये लागवड केलेली झाडे ही आकर्षक व सुशोभित वाटत नसल्याने सदर हरित पट्टा विकसित करताना विविध सुशोभित झाडांची दाट स्वरुपात लागवड केलेली असावी, तसेच त्याची निगा व देखभाल उच्चप्रतीची ठेवण्याबाबतच्या सूचनाही बांगर यांनी यावेळी दिल्या.


हेही वाचा : आनंद दिघेंचे वाक्य वर्मी लागले? गद्दारांना क्षमा नाही, या संदेशाचे बॅनर उतरविले


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -