घरमहाराष्ट्रमुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या, काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या, काँग्रेसचा हल्लाबोल

Subscribe

Yogi Adityanath Mumbai Visit | केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ईडी सरकार पायघड्या घालत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मुंबई – महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ईडी सरकार पायघड्या घालत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खराब आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्वतःच न्यायालय व न्यायाधीश असल्याच्या अविर्भावात बुलडोझर चालवून गोर गरिब व सामान्य माणसांची घरे जमीनदोस्त करते. महिला, अल्पसंख्याक, दलित समाज योगींच्या राज्यात सुरक्षित नाही, ते भयभित होऊन जीवन जगत आहेत. योगी आदित्यनाथ हे धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करतात आणि ज्या राज्यात धर्माच्या नावावर राजकारण केले जाते व सरकार चालवले जाते त्या राज्यात कोणता उद्योगपती गुंतवणूक करण्यास धजावेल ? पण महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या मदतीने उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भाजपाशासित राज्यातील गुंतवणूक वाढावी व महाराष्ट्राचे महत्व कमी व्हावे यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार पाडून ईडीचे सरकार आणले आहे, असे वाटते.

- Advertisement -

मुंबईतील फिल्म उद्योगावर योगी आदित्यनाथ यांचा डोळा आहे. हा उद्योग उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाण्यासाठी याआधीही भाजपाकडून अनेक खटपटी करण्यात आल्या. मविआचे सरकार असताना अनेक निर्माते, अभिनेते व अभिनेत्रींना बदनाम करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईतील चित्रपटसृष्टी नशाबाजांचा अड्डा असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता पुन्हा एकदा चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असून त्याला राज्यातील खोके सरकार मदत करत आहे.


उत्तर प्रदेशातील गुंतवणूक वाढावी यासाठी उद्योगपतींना आवाहन करण्यासाठी मुंबईत आल्याचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे. मग गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची काय गरज आहे? उद्योगपती काय रस्त्यावर उभे राहून भेटणार आहेत का? गुंतवणुकीच्या नावाखाली केवळ मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हाच भाजपाचा अजेंडा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील खोके सरकार कामाला लागले आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -