घरताज्या घडामोडीनवीन प्रदेशाध्यक्ष नेमणुकीच्या हालचालींना वेग, महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सोशल इंजिनिअरींगचे मॉडेल

नवीन प्रदेशाध्यक्ष नेमणुकीच्या हालचालींना वेग, महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सोशल इंजिनिअरींगचे मॉडेल

Subscribe

कार्याध्यक्षपदी मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची नेमणुक ही जवळपास निश्चित मानली जात असतानाच, महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये होणाऱ्या नेमणुकांमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. नाना पटोले यांच्या नावावर गेल्या पंधरवड्यातच शिक्कामोर्तब झाल्यानंतर याबाबतची घोषण होत नसल्यानेच आता महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये अनेक तर्क विर्तक लढवण्यात येत आहेत. पण नव्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची नेमणुक ही सोबतच्या पाच कार्याध्यक्षांच्या नावासह होणार याबाबतची चर्चा सध्या सुरू झाली आहे. कॉंग्रेसने सोशल इंजिनिअरींगच्या मॉडेलमधून पुन्हा एकदा संपुर्ण महाराष्ट्रातून काही चेहऱ्यांना पसंती दिली असल्याचे कळते. त्यामुळेच महाराष्ट्रात कॉंग्रेसचा समतोल साधण्यासाठी ही हालचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे. या नव्या चेहऱ्यांच्या नावासहच आज बुधवारी किंवा उद्या गुरूवारी ही घोषणा होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्ष नेमणुकीचाही तिढा सोडवण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याआधीच आपल्याकडे अनेक पदांची जबाबदारी असल्याने आपल्याकडून ही जबाबदारी तरूण नेतृत्वाला मिळावी असे मत मांडले होते. तर कॉंग्रेसमधील एक गट हा प्रदेशाध्यक्ष इतक्यात बदलू नये अशीही लॉबिंग करत आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मंगळवारी रात्री नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे या सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून कॉंग्रेसच्या नव्या चेहऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता आता वाढली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनी संपुर्ण राज्यातून विविध भागातील सहप्रभारींची नावे ही कॉंग्रेसकडून मागवण्यात आली होती. त्यामध्ये तरूण चेहऱ्यांसोबतच विश्वासू सहकाऱ्यांनाही संधी देण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकांपूर्वीच कार्याध्यक्षपदी असणाऱ्या नेमणुकांपैकी काही जणांना मंत्रीपद मिळाल्यानेच आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे. त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र अशा पद्धतीचा समतोल साधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र कॉंग्रेसच्या बाबतीत होत असताना दिसत आहे.

- Advertisement -

नाना पटोले दिल्लीत हजर असल्याचे या नावांची घोषणा लवकरच होण्याची चिन्हे निर्माण झालेली आहे. नव्या कार्याध्यक्षांमध्ये सोशल इंजिनिअरींग साधतानाच उत्तर महाराष्ट्रातून कुणाल पाटील, पश्चिम महाराष्ट्रातून प्रणिती शिंदे,
मराठवाड्यातून कैलास गोरंट्याल, कोकणातून हुसेन दलवाई, विदर्भातून वसंत पुरके या चेहऱ्यांना पसंती मिळू शकते असा अंदाज कॉंग्रेसच्या वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. नवीन कार्याध्यक्षांच्या नेमणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा कॉंग्रेसमध्ये वेगळ सोशल इंजिनिअरींग करण्याची तयारी सुरू झालेली आहे.

नाना पटोले यांच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या नेमणुकीमुळे आता विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्दी लागणार या चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीत याबाबतचे कोणताही संवाद आतापर्यंत झालेला दिसत नाही. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना विश्वासात घेऊन नव्या विधानसभा अध्यक्षांची घोषणा होणार की कॉंग्रेस परस्पर ही घोषणा करणार हे अद्यापही अस्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी एकमताने महाविकास आघाडीत निर्णय घेतला जाईल असे बोलले जात असले तरीही अद्यापही कॉंग्रेसमार्फत शिवसेना किंवा राष्ट्रवादीसोबत या विषयावर चर्चा झाली नसल्याचे कळेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मराठवाड्याचे नेते सुरेश वडपुरकर यांचे नाव चर्चेत आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध असल्याचे कळते. आदिवासी विकास मंत्री के सी पडवी यांच्या नावाचीही जोरदार चर्चा एकायला मिळत आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -