घरमहाराष्ट्रयशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना शिव्या हासडल्या आणि तालुक्याला पाणी मिळालं

यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना शिव्या हासडल्या आणि तालुक्याला पाणी मिळालं

Subscribe

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्यात यावे, याबाबत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. या मागणीला डावलले जात असल्याचे लक्षात येताच यशोमती ठाकूर यांनी रौद्ररुप धारण करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. धरणाचे दरवाजे उघडण्यात यावेत, यासाठी त्यांनी भर बैठकीतच अधिकाऱ्यांना शिव्या हासडल्या. त्यानंतर आता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

तिवसा तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटावा यासाठी रविवारी रात्री १२ वाजता अप्पर वर्धा धरणाला पाणी सुटणार असल्याचे पत्र आणि आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काढले होते. पाणी सोडण्याच्या काही तास अगोदर अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे सोमवारी दुपारी १ वाजता काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाधक्ष बबलू देशमुख यांनी २० मिनिटे जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या देत शासना विरोधात घोषणा दिल्या.

- Advertisement -

त्यानंतर जलसंपदा विभागात पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत यशोमती ठाकूर यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी रवींद्र लाडेकर यांना धारेवर धरत पक्षपात करण्याचा आरोप करत त्यांना शिवीगाळ केली. तसेच अधिकाऱ्यांच्या दिशेने कागदही भिरकावले. यशोमती ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याचे जाहीर केले.

भाजपच्या दबावामुळेच पाणी सोडले नाही

बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, तिवसा तालुक्याला पाणी सोडण्यासाठी भाजपने अडथळा आणला होता. फक्त मला श्रेय मिळू नये यासाठी भाजप आमदार अनिल बोंडे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून पाणी न सोडण्याचे आदेश दिले होते, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -