घरमहाराष्ट्रकोरोनामुळे एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन!

कोरोनामुळे एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन!

Subscribe

पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, अमरावती, सांगलीत विद्यार्थी रस्त्यावर, परिक्षेची नवी तारीख जाहीर होणार आज, परिक्षेसाठी वयाचे कोणतेही बंधन नसेल, येत्या आठ दिवसात एमपीएसीची परीक्षा

राज्य सरकारने कोरोनाचे कारण देत महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगाची येत्या रविवारी १४ मार्च रोजी होणारी परीक्षा सलग चौथ्यांदा पुढे ढकलताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात ठिकठिकाणी सरकारच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमारही केला.

पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, अमरावती, सांगलीमध्ये रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. परिक्षेची नवी तारीख मुख्य सचिव सिताराम कुंटे हे शुक्रवारी जाहीर करतील, नवीन तारखा ह्या जास्तीत जास्त आठ दिवसांमधील असतील. परिक्षा पुढे ढकलल्याने एकाही विद्यार्थ्याचे वर्ष फुकट जाऊ नये म्हणून वयोमर्यादेबाबत राज्य सरकार कोणतेही बंधन घालणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केलेल्या निवेदनात दिले.

- Advertisement -

नियोजित वेळेप्रमाणे एमपीएससीची परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. मात्र, सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सरकारने हा निर्णय जाहीर करताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कित्येक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्ष भाजपनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याला वेठीस धरणे योग्य नसल्याचे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

- Advertisement -

नागपूर, सांगलीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संताप
सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद नागपूर आणि सांगलीमध्ये उमटले. नागपुरात सक्करदरा चौकात जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर सांगलीमध्येसुद्धा विधार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

अमरावतीत लाठीमार
एमपीएससीची परीक्षा सलग चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे संतापलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली. अमरावतीत कोरोना संसर्गामुळे संचारबंदी असल्यामुळे पोलिसांनी या विद्यार्थ्यांना हटकले. मात्र, तरीही विद्यार्थी ऐकायला तयार नसल्यामुळे पोलिसांना अखेर सौम्य लाठीमार करावा लागला.

जळगावात रास्ता रोको
राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे जळगावातील विद्यार्थ्यांनीही संताप व्यक्त करत कोर्ट चौकात रास्ता रोको केला. यावेळी 250 ते 300 विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

कोल्हापुरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. तसेच, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एकत्र येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या प्रकारमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कोरोनामुळे आणि परिक्षा घेण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने येत्या आठ दिवसांत एमपीएससीची परीक्षा घेण्यात येईल. त्याची तारीख शुक्रवारी मुख्य सचिव जाहीर करतील. विद्यार्थ्यांना वयोमर्यादेची कोणतीही अट बाधक ठरणार नाही. विद्यार्थ्यांनी कोणाच्याही भडकवण्यात येऊ नये. कोरोनाच्या कारणामुळेच एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या नियोजनासाठी कर्मचार्‍यांची व्यवस्था करावी लागणार आहे. हे कर्मचारी लस घेतलेले असणे आवश्यक आहे. ही सर्व व्यवस्था करण्यात येईल आणि परीक्षा निर्धोकपणे, कोरोना विरहीत पार पडतील. विद्यार्थ्यांची थोडीशी गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.

एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्यामुळे वर्षानुवर्षे तयारी करणार्‍या असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. राजकीय पक्षांच्या रॅली चालू आहेत. आंदोलने चालू आहेत. परीक्षेमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. सरकारने दिलेले कोरोनाचे कारण अतिशय तकलादू आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द करणे चुकीचे होईल. मराठा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल. पण आज या परीक्षा तात्काळ घ्यायला हव्यात.-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.

माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला हा निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला हा निर्णय असल्याने याबाबत चौकशी केली जाईल.-विजय वडेट्टीवार, आपत्ती निवारण मंत्री.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -