Corona Vaccination : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण; मुख्यमंत्र्यांनी केले आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन

शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Corona Vaccination

भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन रविवारी साजरा केला जाणार आहे. त्याआधी शनिवारी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आखणी एक विक्रम नोंदवला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. या कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. दिवसाला किमान १० लाख लोकांचे लसीकरण करण्याची राज्याची क्षमता असून दिवसभरात झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे. यापुढेही अशाच विक्रमी संख्येने लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असेल, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती, त्यात आजच्या लसीकरणाच्या सर्वोच्च संख्येने महाराष्ट्राने अजून एक नवा विक्रम केल्याचे डॉ. व्यास म्हणाले.