रुग्णालयात दाखल न केल्याने कोरोनाग्रस्त घुसला आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत

covid patient entered in health minister rajesh topes press conference

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत आज शुक्रवारी कोरोनाचा रुग्ण घुसला. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. अमरावतीच कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. दरम्यान, पत्रकार परिषद सुरु असताना अचानक कोरोनाबाधित व्यक्ती कार्यालयात घुसला.

कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान ३५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती पत्रकार परिषदेत घुसला. अचानक सर्व घडल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसमोरच हा प्रकार घडल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाली. यावेळी, मला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यानंतरही जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याचा आरोप रुग्णाने केला. तसंच आरोग्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी त्याने केली. आरोग्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नसल्याचं तो म्हणाला.

अमरावतीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला. अमरावतीत कोरोनाचे १२ हजार १८२ रुग्ण आहेत. तर एकूण ८ हजार ८५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या तीन हजार रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत २४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.