घरमहाराष्ट्रनाशिकMahendra More Death : भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू, तीन दिवसाआधी...

Mahendra More Death : भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा मृत्यू, तीन दिवसाआधी झाला होता गोळीबार

Subscribe

7 फेब्रुवारीला गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेले भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे तीन दिवसाआधी भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मोरेंचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महेंद्र मोरे हे 7 फेब्रुवारीला आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी खळबळ उडाली. (Death of former BJP corporator Mahendra More was shot three days ago)

हेही वाचा… गोळीबाराच्या घटनेनंतर सेना-भाजपात तणाव

- Advertisement -

नाशिकच्या अशोक रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. 10 फेब्रुवारी) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास महेंद्र मोरे यांची प्राणज्योत मालवली. 7 तारखेला मोरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण ते उपचारांना साथ देत नव्हते. म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टरांकडून त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने आणि तब्बल सात गोळ्या मोरे यांना लागल्याने त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला.

बुधवारी, 7 फेब्रुवारीला चाळीसगाव शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हे रेल्वे स्थानकाजवळील हनुमानवाडीतील कार्यालयात उपस्थित होते. हनुमानवाडी याठिकाणी संध्याकाळी पाचच्या सुमारास कारमधून आलेल्या पाच जणांनी त्याच्या कार्यालयाजवळ गाडी थांबवली आणि आत प्रवेश करत समोर बसलेल्या बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर 8 गोळ्या झाडल्यानंतर ते गाडीत बसून फरार झाले. याप्रकरणी आता 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अद्यापही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

पोलिसांनी गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (31 वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरून उददेश उर्फ गुडडू शिंदे (रा. हिरापुर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव), सॅम चव्हाण (रा. हिरापुर), भुपेश सोनवणे (रा. चाळीसगाव), सुमित भोसले (रा. चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापुर) यांच्याविरुद्ध गु. रं. नं 56/2024 भादवि कलम 307, 120 (व), 143, 144, 147, 148, 149 सह शस्त्रअधिनियम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला, तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते, असे अजय बैसाणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. चाळीसगावमधील स्टेशनरोड भागात महेंद्र मोरे राहायचे. अपक्ष आणि भाजपाच्या तिकीटावर ते नगरसेवक राहिले आहेत. याप्रकरणात एक सीसीटीव्ही फूटेज समोर आला होता. यात काही हल्लेखोर तोंड झाकून येत असताना दिसत आहेत. हल्ला कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यामागे काही राजकीय कारण आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.

गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे आता राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्याने पोलीस स्टेशनमध्येच एकावर गोळीबार केला होता. तर फेसबुक लाईव्ह दरम्यान एका ठाकरे गटाच्या नेत्याची हत्या करण्यात आलीये. त्यानंतर आज झालेल्या मृत्यूमुळे त्यात भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील या घटनांना कोणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -