घरठाणेगोळीबाराच्या घटनेनंतर सेना-भाजपात तणाव

गोळीबाराच्या घटनेनंतर सेना-भाजपात तणाव

Subscribe

भाजपाचे पदाधिकारी आमदार गायकवाडांच्या पाठीशी ?

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे या मतदार संघातून मागील दोन वेळा निवडून आले असताना देखील या मतदार संघावर भाजपा दावा करीत आहे. गेल्या चार वर्षात कल्याण लोकसभा मतदार संघात सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपा मध्येच अंतर्गत संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सेना-भाजपा मधील हा संघर्ष मिटला असे वाटत होते. मात्र ते वरवरचे दिखाऊ चित्र होते. उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर या दोन्ही पक्षातील संबंध आता कमालीचे बिघडले असल्याचे चित्र आहे. भाजपाने राज्यात 45 प्लस जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवत कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील भाजपाने आपली दावेदारी ठेवली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासून दौरे केले आहेत. एव्हढेच नव्हे तर भाजपाने तीन मेळावे घेऊन कल्याण लोकसभा हा भाजपचाच असल्याचा दावा ठोकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे याच मतदार संघातून 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत सलग दोन वेळा निवडून आले आहेत. तरीही भाजपा या जागेवर दावा करीत असल्याने राज्यात आणि केंद्रात एकत्रित सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे.

2009 च्या मतदार संघ पुनर्रचनेपूर्वी ठाणे लोकसभा मतदार संघ होता. जुन्या ठाणे लोकसभा मतदार संघावर 1984 चा अपवाद वगळता 1977 ते 1996 पर्यंत भाजपाचेच वर्चस्व होते. मात्र 1996 मध्ये शिवसेनेने ठाणे जिल्ह्यात आपली ताकद असल्याचे सांगत जागा वाटपात हा मतदार संघ आपल्याकडे खेचून घेतला. लोकसभा मतदार संघाची पुनर्चना झाल्यानंतर जुन्या ठाणे लोकसभा मतदार संघाचे ठाणे आणि कल्याण असे दोन मतदार संघ झाले. त्यापैकी एक तरी भाजपाच्या वाट्याला येईल, अशी भाजपची अपेक्षा होती .मात्र शिवसेनेने दोन्ही मतदार संघ आपल्याकडेच ठेवल्या,याचे शल्य भाजपाच्या कार्यकर्त्यांना आजही बोचत आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा पैकी शिवसेनेकडे केवळ एकच अंबरनाथ विधानसभा मतदार संघ आहे. कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे आमदार राजू पाटील आणि कळवा-मुंब्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. उर्वरित तीन मध्ये डोंबिवलीत भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि उल्हासनगरचे भाजपाचे आमदार कुमार आयलानी आहेत.गेल्या चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले, पोलीस केसेस आणि विकास कामांचा निधी यावरून खासदार श्रीकांत शिंदे व भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे एकमेकांशी फारसे जमत नसल्याचे चित्र पहायाला मिळाले.ट्विटर वार आणि बॅनरबाजीतून वाद, संघर्ष जनतेने पाहिलेला आहे. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने महिनाभरापूर्वी दोन्ही पक्षातील आमदार, खासदार आणि पदाधिकारी कार्यक्रमात एकत्र दिसू लागले होते. त्यामुळे मागील वादावर पडदा पडला असे वाटत होते. मात्र ते दिखाऊ चित्र ठरले. उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटने नंतर भाजपाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे , खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो बॅनरवर टाकायचे नाहीत ,भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीमागे उभे राहायचे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे तोंडावर आलेली आगामी लोकसभा निवडणूक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासाठी वाटते तितकी सोपी राहिलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -