घरमहाराष्ट्र15 एप्रिलपूर्वी राज्‍यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी

15 एप्रिलपूर्वी राज्‍यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी

Subscribe

३२ लाख शेतकर्‍यांची नोंद, ८५ टक्के शेतकरी पात्र ,२१ फेब्रुवारीपासून यादी

ठाकरे सरकारच्या बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी म्हणजेच महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आतापर्यंत एकूण ३२ लाख १६ हजार २७८ शेतकर्‍यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाल्याची माहिती शुक्रवारी समोर आली आहे. त्यात या योजनेसाठी पात्र असलेल्या ८५ टक्के शेतकर्‍यांची माहितीही देण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीपासून या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या जाहीर होणार आहेत. या योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी शेतकर्‍यांना द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील २ लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना महात्मा जोतीराव फुले ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपल्या वचननाम्यात कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे मुंबईसह संपूर्ण देशाचे लक्ष या योजनेकडे लागून राहिले आहे. त्यामुळे या योजनेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलाविली होती. या बैठकीत वरील माहिती देण्यात आली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंमलबाजावणीकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष आहे.

- Advertisement -

त्यामुळे आपण या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा दररोज घेणार आहे. अल्पावधीत या कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले, तर कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीची तयारी करताना येणार्‍या लहान लहान तांत्रिक समस्यांचेही निराकरण करणे महत्त्वाचे आहे. शेतकर्‍यांच्या नावाच्या याद्या प्रसिद्ध झाल्यावर त्यांची एकच झुंबड होईल. अशा वेळी योग्य ते नियोजन करावे व शेतकर्‍यांशी आत्मीयतेने संवाद साधा व त्यांचे म्हणणे ऐका, अडचणी दूर करा अशा सूचना करताना ते म्हणाले की, कर्जमुक्ती म्हणजे आपण शेतकर्‍यांवर उपकार करीत नसून त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत, अशा भूमिकेतून मदत करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या योजनेचा आढावा घेताना या योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रशासनाने सहा महिन्यांचे काम अवघ्या ३५ दिवसांत केले असून कर्मचार्‍यांचा हा ‘जोश’ असाच टिकवून ठेवा व १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करा, असे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले, तर योजनेतील पात्र शेतकर्‍यांपैकी ९५ टक्के आधार जोडणी पूर्ण झाली असून सर्व बँकांचे संपूर्ण सहकार्य मिळाले आहे. २१ फेब्रुवारीपासून गावोगाव याद्या प्रसिद्धी आणि आधार प्रामाणिकरण सुरू होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, तर ११ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष यंत्रणा कशी काम करते याची पडताळणी सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -