घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कोणी तयार नाही

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मानायला कोणी तयार नाही

Subscribe

हिंसाचाराच्या मागे राजकीय ध्रुवीकरणाचा पॅटर्न, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठक

राज्यातील अमरावती, नांदेड आदी ठिकाणी झालेला हिंसाचार हा एक प्रयोग आहे. यामागे एक पॅटर्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणाला उत्तर देता येत नाही म्हणून देशात अराजक निर्माण करायचे आणि मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करायचे यासाठीचा हा प्रयोग होता आणि तो राज्य सरकारच्याच समर्थनाने झाला, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केला. तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला कोणी तयार नाही, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हजारो कोटींची लूट सुरू आहे. वाटमारी सुरू आहे; पण जनसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणाकडेही वेळ नाही. या सरकारच्या विरोधात आता रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात पार पडली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आघाडी सरकारवर तोफ डागली. मालेगावमध्ये झालेली हिंसा हा प्रयोग होता. देशात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठीचा हा पॅटर्न होता, असा आरोप त्यांनी केला. दंगलीत हिंदुंची दुकाने निवडून जाळली जातात; पण महाविकास आघाडीचा एकही नेता एक शब्द बोलत नाही.हिंदू असो वा मुस्लीम कोणाचीच दुकाने जाळली जाता कामा नये. पण एक तरी नेता हे चुकीचे असल्याचे बोलला नाही. आम्ही कधी दंगल करत नाही; पण आमच्या अंगावर कोणी चालून आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्याच नाहीत त्याबद्दलचे खोटे फोटो सोशल मीडियावरून पसरविण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ८ नोव्हेंबरला त्रिपुरात अत्याचार होत असल्याचे ट्विट केले. लगेच ११ नोव्हेंबरला महाराष्ट्रात मोर्चे निघाले, असेही फडणवीस म्हणाले. आता विचारांचा नक्षलवाद संपला आहे. पर्यायी नक्षल अर्थव्यवस्था आता तयार झाली आहे. नेपाळपासून दक्षिणेपर्यंत एक रेड कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांकडे जे साहित्य सापडले त्यातून त्यांना पाकिस्तान आणि आयसीसची मदत मिळते हे दिसून आले असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर भाड्याच्या घरात राहिलो
मी महाराष्ट्राचा पाच वर्षे मुख्यमंत्री होतो.पण ज्यावेळी मुख्यमंत्रिपद सोडले त्यानंतर चार महिने भाड्याच्या घरात राहिलो. सरकारी बंगला मिळाल्यानंतर त्यात राहायला गेलो. मुंबईत स्वतःचे घरही नाही. आमच्याकडे इनामीही नाही आणि बेनामीही नाही.त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. या सरकारमध्ये हर्बल तंबाखू, वसुली, स्थगिती, खंडणी यावर चर्चा होते. पण जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. आता आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावेच लागेल. दोन वर्षे कोरोना होता म्हणून आम्हाला रोखत होते.आमच्यावर गुन्हे दाखल करत होते. पण आता ते आम्हाला रोखू शकत नाहीत, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सरकारचे अस्तित्वच दिसत नाही
राज्यात सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. एक मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायलाच तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो.पण आपल्या पलिकडे पहायची कोणाची तयारी नाही, अशी टीका करताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -