घरमहाराष्ट्रआता एकनाथ खडसे कोणती सीडी लावणार?

आता एकनाथ खडसे कोणती सीडी लावणार?

Subscribe

‘मी काही लेचापेचा नाही. ते ईडी लावतील, तर मी सीडी लावेन!’ अवघ्या २ महिन्यांपूर्वीचं एकनाथ खडसे यांचं हे विधान. दोनच महिन्यांपूर्वी म्हणजे २३ ऑक्टोबर २०२० रोजी एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले होते, ‘कुणालातरी समोर ठेऊन आरोप करायचे हे मी कधी केलं नाही. मी काही लेचापेचा नाही. जयंत पाटलांना म्हणालो. मला राजकारणात यायचंय. जयंत पाटील म्हणाले. ते ईडी तुमच्या मागे लागेल. मी म्हटलो ते ईडी लावतील, तर मी सीडी लावेन.’ आता एकनाथ खडसेंच्या त्याच विधानाचा संदर्भ वास्तवात उतरताना दिसू लागला आहे. कारण एकनाथ खडसे यांना ईडीनं नोटीस पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून तसं झाल्यास, आता नाथाभाऊ नेमकी कोणती सीडी लावणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यातील भूखंड प्रकरणाचं भूत!

पुण्यातील कथित वादग्रस्त भूखंडप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात, यावर एकनाथ खडसे यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना ‘अजून कोणतीही नोटीस आलेली नाही’, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र, येत्या बुधवारी म्हणजेच ३० डिसेंबर रोजी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. तरीदेखील अशा प्रकारे एकनाथ खडसेंना नोटीस आल्यास, त्यावर खडसे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुण्यातील वादग्रस्त भूखंड प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंना क्लीनचिट दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ते प्रकरण एकनाथ खडसेंना अडचणीत टाकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्रात नाथाभाऊंची मोहीम!

दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून एकनाथ खडसेंनी भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात जिथे एकनाथ खडसेंचा प्रभाव आहे, अशा ठिकाणी एकनाथ खडसेंनी भाजपला खिंडारं पाडायला सुरुवात केली आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या काळात एकनाथ खडसेंसोबतच भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे याचाच राग मनात ठेऊन भाजपनं एकनाथ खडसेंविरोधात ईडीचं हत्यार उपसलं असल्याची राजकीय चर्चा आता ऐकायला मिळत आहे.


वाचा काय म्हणाले होते एकनाथ खडसे – मी काही लेचापेचा नाही; त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -