घरताज्या घडामोडी‘लंपी’ आजाराची नाशिकमध्ये एन्ट्री, सिन्नर तालुक्यातील जनावरांना बाधा

‘लंपी’ आजाराची नाशिकमध्ये एन्ट्री, सिन्नर तालुक्यातील जनावरांना बाधा

Subscribe

प्रशासन अलर्ट, दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित घोषित

‘लंपी’ या विषाणुजन्य आजाराने नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शिरकाव केला आहे. तालुक्यातील मौजे पांगरी व दुसंगवाडी या गावांमध्ये जनावरांना ‘लंपी’ या विषाणुजन्य आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून बाधित क्षेत्रातील दहा किलोमीटर परिघातील परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जनावरांचे लसीकरणाचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांनी दिले आहे.

राज्यामध्ये जळगाव, अकोला, अहमदनगर, कोल्हापूर, बीड, पुणे, धुळे, सातारा, औरंगाबाद, बुलढाणा, लातूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराची लक्षणे दिसून आले आहेत. नैसर्गिक संकटाच्या समस्येच्या गर्तेत नेहमीच अडकून असलेला शेतकरी लंपीने आणखी अडचणीत आला आहे. सिन्नर तालुक्यात गेल्याच आठवडयात झालेल्या ढगफुटीने आधीच नागरिक तसेच शेतकरीही दुष्टचक्रात अडकलेला असतांना आता तालुक्यात लंपी आजाराने प्रवेश केल्याने शेतकरी व दुग्धव्यावसायिक या विषाणुजन्य आजारामुळे चिंतेत आहे. लंपीचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीची पावले उचलली आहेत. पशुपालक शेतकर्‍यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्याअनुषंगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जुंतुकीकरण करून १० किलोमीटर परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजीत करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. तसेच बाधित क्षेत्रातील भोवतालची पाच किलोमीटर परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पशुसंवर्धन विभागाने बाधित भागात शीघ्र कृतीदल स्थापन करून साथीचा आजार नियंत्रणात आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -