घरमहाराष्ट्रचांगल्या कामाला राजकीय विरोध न करता प्रोत्साहन द्यावे; अजितदादांचा नाव न घेता...

चांगल्या कामाला राजकीय विरोध न करता प्रोत्साहन द्यावे; अजितदादांचा नाव न घेता नितेश राणेंना टोला

Subscribe

महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून गिरगाव चौपाटी येथे साकारण्यात आलेल्या 'दर्शक गॅलरी'चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले.

मुंबई : गिरगाव चौपाटी येथील दर्शक गॅलरीच्या कामाला राजकीय विरोध न करता प्रोत्साहन द्यायला हवे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला आहे. महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून गिरगाव चौपाटी येथे साकारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांना टोला लगावला.

गिरगाव चौपाटी जवळील दर्शक गॅलरीचे काम सुरु असताना सीआरझेडची परवानगी घेतली का, खोदकाम कसे करतात, अशा प्रकारचा आक्षेप काहींनी घेतला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी परवानग्या घेतल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे चांगले काम होत असताना राजकीय विरोध न करता प्रोत्साहन द्यावे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भाजप आमदार नितेश राणे यांना लगावला.

- Advertisement -

दरम्यान, दर्शक गॅलरीत उभे असताना समुद्राला भरती आली असता समुद्रात उभे असल्याचा अनुभव येईल, असा विश्वासहि अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईचा विकास होणे गरजेचे आहे. परंतु पर्यटन मंत्र्यांच्या हट्टापायी पैशाचा गैर वापर होत असेल, नियम धाब्यावर बसवले जात असतील तर पालिका आयुक्तांनी संबंधित एमआरटीपी अंतर्गत व सीआरझेड अँक्टनुसार संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला होता.

महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून गिरगाव चौपाटी येथे साकारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे, खा. अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आ. मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त पालिका आयुक्त इक्बाल चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, पालिकेचे संबंधित अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन ‘स्वराज्यभूमी’ अर्थात ‘गिरगाव चौपाटी’लगत नव्याने उभारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या ‘दर्शक गॅलरी’ चे भूमिपूजन गेल्यावर्षी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या ८ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले.

- Advertisement -

अयोध्या श्रद्धेचा मुद्दा, त्यात राजकारण नको -: आदित्य ठाकरे

आम्ही अयोध्याला देशाच्या विकासासाठी आणि शांतीसाठी अयोध्याला जाणार आहोत, अयोध्या हा श्रद्धेचा मुद्दा, त्यात उगाचच कोणी राजकारण आणू नये, असे मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच निवडणुकीनंतर 5 वर्षाच्या काळात विविध पद्धतीची कामे केली जातात. त्या कामांचे उद्घाटन आम्ही नेहमी करीत असतो. वाळकेश्वरला वॉकिंग ट्रॅक तयार करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -