घरमहाराष्ट्रगुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरण तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

गुडविन ज्वेलर्स फसवणूक प्रकरण तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

Subscribe

गुडवीन ज्वेलर्सने हजारो गुंतवणूकदाराना कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पळ काढला आहे. आत्तापर्यंत ६९ जणांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून फसवणुकीची रक्कम 3 कोटी 87 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता असल्याने याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात येणार असून मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुडविन ज्वेलर्समध्ये भिशी योजना, फिक्स डिपॉझिट या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र ऐन दिवाळीत ज्वेलर्स बंद करून मालक फरार झाल्याने हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.आत्तापर्यंत ६९ जणांनी पुढे येत पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आणखी शेकडो जण तक्रार करणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील कुमार आणि सुधीश कुमार हे पलावा येथे राहतात. मात्र आठ दिवसांपूर्वीच ते कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

डोंबिवलीत राहणारे राजेश मिश्रा यांनी बहिणीच्या लग्नासाठी आणि मुलाच्या मेडिकल अ‍ॅडमिशनसाठी गावची जमीन विकली. गुडविन ज्वेलर्सकडून १६ टक्के व्याज मिळत असल्याने जमिनीचे ४० लाख त्यांनी गुंतवले. येत्या 4 डिसेंबरला त्यांची म्यॅुच्युरिटी संपणार होती. पण त्या आधीच ऐन दिवाळीत गुडविन ज्वेलर्स पळल्याची बातमी कानावर पडली आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. डोळ्यासमोर अंधार आला…बहिणीचं लग्न आणि मुलाचं शिक्षण कसं करायचं याच टेन्शन मिश्रा यांना आले आहे. मिश्रा यांचे वडीलही आजारी असून त्यांची बायपास झाली आहे. मिश्रांसारखे हजारो गुंतवणूकदार याच विवंचनेत आहेत. टक्केवारीच्या आमिषाने हजारो गुंतवणूकदारांचा घात झाला आहे. यातून सर्वसामान्य नागरिक धडा घेईल का ? हाच खरा प्रश्न आहे.

गुडविनचे मालक कॅमेरापुढे
गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील कुमार आणि सुधीश कुमार यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्यांनी, आपण कोणाचेही पैसे बुडवणार नाहीत. गुडविनची मालमत्ता इतकी आहे की, त्यामुळे सर्वांचे पैसे देणे सहज शक्य आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी धीर धरावा, असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -