घरमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा, शिवसेनेचा भोपळा

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा, शिवसेनेचा भोपळा

Subscribe

विधान परिषदेच्या सहा जागांवर झालेल्या निवडणुकीत चार जागांवर महाविकास आघाडी सरकारने विजय मिळवत भाजपचा धुव्वा उडवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला केवळ धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था या एकाच जागेवर विजय मिळवता आला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबरला झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला सुरु झाली. तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एका धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार लढाई होती. दोन्ही बाजुंनी ताकद पणाला लावली होती. मात्र, या लढाईत ठाकरे सरकारच्या महाविकास आघाडीने बाजी मारली. महाविकास आघाडीच्या एकीने भाजपच्या पुणे आणि नागपूर या गडांना हादरा दिला आहे. शिवाय, पुण्यात आणि नागपुरमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, एका जागेवर लढलेल्या शिवसेनेला तीन पक्षांचे पाठबळ असूनही जागा जिंकता आलेली नाही.

धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत अमरिश पटेल यांचा एकतर्फी विजय

धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार अभिजीत पाटील यांना पराभूत केले. अमरीश पटेल यांना ३३२ मते तर अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. अमरीश पटेल यांना मिळणार केवळ वर्षभर आमदारकी मिळणार आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार लढाई होती. दोन्ही बाजुंनी ताकद पणाला लावली होती. मात्र, या लढाईत भाजपने बाजी मारली आहे.

- Advertisement -

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांचा विजय

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाला महाविकास आघाडीने महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवून भाजप आणि मुख्यत्वे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हादरा दिला. चंद्रकांतदादांनीच माझा विजय सोपा केला, असा टोलाही अरुण लाड यांनी विजयानंतर लगावला. अरुण लाड यांना एकूण १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली तर विरोधी उमेदवार संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली.

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक, बोराळकरांवर केली मात

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पराभूत करत विजयाची हॅटट्रिक साधली आहे. सतीश चव्हाण यांना तब्बल १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतांवर समाधान मानावे लागले आहे. सतीश चव्हाण यांनी ५७ हजार ८९५ मतांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढले असे मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

विधानपरीषदेच्या नागपूर पदवीधर निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना ६१ हजार ७०१ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना ४२ हजार ९९१ मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा १८ हजार ७१० च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला. भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी ट्विटरवर दिली आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर

पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. विसाव्या बाद फेरी अखेर जयंत आंसगावकर यांना १७ हजार ११७ इतकी मते मिळालेली आहेत. तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना ११ हजार १६१ इतकी मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार इथे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. त्यांना पाच हजार ८७८ इतकी मते मिळालेली आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -