घरमहाराष्ट्रकोकणातील हापूस आंबा उत्पादक संकटात, उष्माघातामुळे फळगळती

कोकणातील हापूस आंबा उत्पादक संकटात, उष्माघातामुळे फळगळती

Subscribe

आधीच उशिरा फुटलेला मोहोर, त्यात थ्रिप्स आणि तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव आणि आता वाढत्या उष्माघातामुळे सुरू झालेली फळगळ यामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीला आला आहे.

काही दिवसांपूर्वीच आलेल्या मुसळधार पावसानं सगळीकडेच दाणादाण उडवली. यात कोकणातील आंबा शेतकरी वर्गाला देखील मोठा फटका बसलाय. आधीच उशिरा फुटलेला मोहोर, त्यात थ्रिप्स आणि तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव आणि आता वाढत्या उष्माघातामुळे सुरू झालेली फळगळ यामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक फुकट जाण्याची भीती बागायतदार शेतकरी व्यक्त करीत आहेत.

यंदा वातावरण बदलामुळे ६० टक्के झाडांना मोहरच आला नाही, तर काही झाडांना उशिराने मोहर आला होता. त्यातून आंब्यांचे थोडे फार उत्पन्न हाती येईल, या आशेने शेतकरी सुखावला होता. झाडांना फळधारणा सुरू असतानाच गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अचानक उष्णतेत वाढ झाल्याने आंब्याचे फळ गळून खाली पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग आल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. सन बर्न झालेले हे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. सन बर्न म्हणजे उष्ण तापमान सहन होत नसल्याने आंब्याची मोठी फळगळ होत आहे. कोकण किनारपट्टी भागातील आंबा बागायदारांना याचा सर्वाधिक फटका बसला होता.

- Advertisement -

स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास आंबा मोहोरतो व आंब्यासाठी पोषक वातावरण आवश्यक असते. मात्र अवेळी सुरू झालेला पाऊस, सतत असणारे ढगाळ वातावरण हे आंब्यासाठी पोषक नाहीच. त्यामुळे हे हवामान बदलाचे संकट लवकर टळू दे, अशी प्रार्थना कोकणवासीय करत आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. परंतु शेतकऱ्यांना मात्र सरकारकडून दिलासा मिळत नाही. त्यामुळे कोकणी शेतकरी संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

आता या वातावरण बदलाचा अभ्यास अभ्यासकांनी करावा आणि त्यातून किमान काय मार्ग असेल तर सुचवावा, अशी मागणी हा शेतकरी करत आहेत. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे उशिराने आलेला मोहर या सर्व कारणांमुळे एकूण उत्पादन क्षम क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर या उष्णतेमुळे नव्याने आलेला मोहर तग धरु शकला नाही. फळधारणा होत असतानाच हे संकट ओढावले असल्याने अर्ध्याहून अधिक आंबा वाया जाणार आहे. त्यामुळे १० एप्रिलपर्यंत आंब्याची चव लोकांना चाखता येणार आहे. त्यानंतर मे महिन्यात आंब्याचा तुटवडा भासू शकतो, असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -