घर उत्तर महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपी; 'काय' आहे संपूर्ण प्रकरण?

तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपी; ‘काय’ आहे संपूर्ण प्रकरण?

Subscribe

नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेबइझी इन्फोटेक परीक्षा केंद्रावर गुरुवारी (दि.१७) तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान हायटेक कॉपीचा प्रकार पोलिसांनी उघड केला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून मोबाईल व गॅझेट्स जप्त केले. या घटनेमुळे शहरात दिवसभर पेपर फुटीची जोरदार चर्चा सुरू होती.

राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू होती. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वेबइझी इन्फोटेक केंद्रावर पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान घेतली जात होती. सकाळी गणेश श्यामसिंग गुसिंगे (रा. संजारपूर वाडी, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) हा परीक्षा केंद्राच्या संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाव घेत संशयिताला परीक्षा केंद्राजवळून ताब्यात घेतले. यात संशयिताची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून दोन मोबाईल, हेडफोन, श्रवणयंत्र व एक टॅब असे साहित्य ताब्यात घेण्यात आले. मोबाईल व टॅबमध्ये सुरू असलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे फोटो आढळून आहे.

- Advertisement -

संशयित कुणाला मदत करत होता व त्याच्यासोबत आणखी कुणी सहभागी आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
तलाठी ग्रुप सी पदाची परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान होत आहे राज्यात तलाठी पदाच्या ४ हजार ४६६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ११ लाख १० हजार ५३ उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकालदेखील अटीतटीचा असेल. तलाठी भरतीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. इच्छूक उमेदवार अनेक दिवसांपासून परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहत होते. परंतु, अशा पेपरफुटीच्या शक्यता परीक्षार्थींनी निदर्शनास आणून दिलेली असतानाही सरकारी पातळीवरून फारशी खबरदारी घेतली गेली नसल्याचे या प्रकारावरुन समोर आले.

गैरप्रकार होण्याची शक्यता?

राज्यभरात होत असलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने वर्तविली होती. तर, काही विद्यार्थ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. महाराष्ट्रात नोकरभरती घोटाळे सुरू असून, वनविभाग, मुंबई पोलीस भरतीचे पेपर फुटलेले आहेत. तलाठीची परीक्षा तोंडावर असून, पेपरफोड्या थांबविण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर पेपरफुटी कायदा करावा व परीक्षेचे शुल्क कमी करण्याची मागणी सरकार दरबारी मांडण्याची मागणी विध्यार्थ्यांनी पटोले यांच्याकडे केली होती.

परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर येतात कसे?

- Advertisement -

परीक्षा केंद्रात कोणत्याही प्रकारचे मोबाईल नेण्याची विद्यार्थ्यांना परवानगी नसते. मग, ऑनलाईन असणारे पेपरचे फोटो परीक्षेच्या वेळेत बाहेर येतातच कसे. यात नक्की विद्यार्थी सहभागी आहे की जे खासगी केंद्रचालक आहेत, ते या पेपरचे फोटो काढून बाहेर पाठवतात हा संशोधनाचा विषय आहे.

संशयितांकडून मोठे जाळे उघड होण्याची शक्यता

महसूल विभागातील तलाठी पदाची सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात नवनवीन पेपर फुटीचे प्रकार समोर येत आहेत. या संशयिताने कॉपी करण्यासाठी जी आधुनिक पद्धत वापरली ते बघता या मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभर या कॉपी बहाद्दरांचे नेटवर्क असल्याची शक्यता आहे.

- Advertisment -