घरमहाराष्ट्रहात जोडून उभे राहण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही

हात जोडून उभे राहण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही

Subscribe

मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली भंडारा दुर्घटनेतील कुटुंबियांची भेट

मी आताच पीडित कुटुंबीयांना भेटलो. हात जोडून उभे राहण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही. सांत्वन करता येईल असे शब्दच माझ्याकडे नव्हते, असे भावुक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. भंडारा दुर्घटनेतील कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री अत्यंत भावूक झाले होते.

शनिवारी भंडारा येथील रुग्णालयात आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भंडार्‍यात येऊन पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दुर्घटनेतील पीडित कुटुंबाची मी भेट घेतली. हात जोडून उभे राहण्याशिवाय मी काहीही करू शकलो नाही. त्यांचे सांत्वन करता येईल असे शब्द माझ्याकडे नव्हते, असे भावूक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

- Advertisement -

चौकशी करणार

ही दुर्घटना आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे या चौकशी समितीत असतील. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अपघात अचानक घडला की आणखी कोणती कारणे आहेत, हे तपासले जाईल. घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दोषींवर कारवाई करणार

भंडारा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षभर आपण कोरोनाचा सामना करत होतो. त्यामुळे काही गोष्टींकडे डोळेझाक झाली का? याची चौकशी करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

गाईडलाईन तयार करणार

भंडारा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नवीन गाईडलाईन तयार करण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा अशा घटनांमध्ये कुणाचाही जीव जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक फॉल्टमुळे आग लागली की आणखी काही कारणे आहेत, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे आपले कर्मचारी तणावाखाली होते. त्यामुळे काही दुर्लक्ष झाले का? हे सुद्धा तपासण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

सर्व रुग्णालयांचे ऑडिट

राज्यात पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे. तसे आदेशच देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -