घरमहाराष्ट्रमल्लखांब खेळाला अधिस्वीकृती यादीत स्थान द्या, खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

मल्लखांब खेळाला अधिस्वीकृती यादीत स्थान द्या, खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

Subscribe

भारताच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या मल्लखांब खेळाला राष्ट्रीय खेळांच्या अधिस्वीकृती यादीत स्थान द्यावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. मल्लखांब या अस्सल भारतीय खेळाच्या संवर्धासाठी केंद्र सरकारने त्वरित याबाबत पावले उचलावीत, अशी आग्रही भूमिका खासदार शेवाळे यांनी लोकसभेच्या शून्य प्रहरात घेतली.

खासदार राहुल शेवाळे आपल्या भाषणात म्हणाले की, मल्लखांब हा खेळ प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास सांगणारा खेळ आहे. आजमितीला भारतासह जगभरातील ५० हुन अधिक देशांत हा खेळ खेळला जातो. पहिली विश्व मल्लखांब चॅम्पियन स्पर्धा मुंबईत २०१९ मध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबईच्या कुमारी हिमानी परब या खेळाडूने चमकदार कामगिरी करत जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावले होते. या गुणी मल्लखांब पटू ला सरकारच्या वतीने ‘ अर्जुन पुरस्कार ‘ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, मल्लखांब हा खेळ राष्ट्रीय खेळांच्या अधिस्वीकृती यादीत नसल्याने कुमारी हिमानी परब हिला गुणवत्ता असूनही रेल्वेतील खेळाडू कोट्यातून नोकरी मिळू शकली नाही, ही दुर्दैवी बाब आहे. एकीकडे मल्लखांब खेळाविषयी स्वतः माननीय पंतप्रधान यांनी आपल्या ‘ मन की बात ‘ कार्यक्रमात सहानुभूतीपुर्वक उल्लेख केलेला आहे. तर दुसरीकडे या खेळाला अद्याप अधिस्वीकृती यादीत स्थान नाही. वास्तविक, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेत देशभरातील सर्व राज्यातून खेळाडू सहभागी होतात. तसेच दरवर्षी शाळा आणि महाविद्यालय पातळीवर देखील अशा स्पर्धा भरविल्या जातात. दिवसागणिक लोकप्रिय होणाऱ्या या खेळाच्या आणि मल्लखांब पटुंच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने त्वरित अधिस्वीकृती खेळांच्या यादीत मल्लखांब चा समावेश करावा.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -