Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारतात करोनाच्या स्टेज ३ चा धोका डोकावतोय?

भारतात करोनाच्या स्टेज ३ चा धोका डोकावतोय?

Related Story

- Advertisement -

भारतासह मुंबई आणि महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांची आकडेवारी पाहता ६४ वरुन ७४ वर हा आकडा पोहोचला आहे. त्यामुळे, जर सांगितलेले नियम आणि सुचना भारताच्या जनतेने पाळल्या नाहीत तर भारतात स्टेज ३ टप्पा गाठू शकतो. त्या दिशेने भारत वाटचाल करत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

करोना व्हायरसचा प्रसार आणि प्रादुर्भाव गर्दीतून सर्वात जास्त पसरतो. त्यामुळे, वारंवार गर्दी टाळा असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. असे असतानाही मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. शिवाय, जे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांना क्वॉरंटाईन केले जात आहे त्यांना देखील या गोष्टीचे गांभार्य नसल्याकारणाने सर्रास मुंबईत आणि महाराष्ट्रात फिरत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे, सद्यस्थितीत भारत स्टेज २ मध्ये आहे. पण, जर वारंवार सांगूनही नियम पाळले नाहीतर भारत तिसऱ्या टप्प्यात डोकावेल आणि परिस्थिती नियंत्रण करणे कठीण होईल अशी भीतीही तज्ज्ञ व्यक्त करतात.

- Advertisement -

राज्यात सध्या ७४ करोना रुग्ण आहेत. ही संख्या शनिवारी ६४ होती आता त्यात १० ने भर होऊन हा आकडा ७४ झाला आहे. त्यात ६ मुंबईचे आणि ४ पुण्याचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ५ संसर्गातून पॉझिटिव्ह आहेत आणि ५ परदेशातून आलेले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. एच.एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या परदेश दौरा होता कि त्यांना संसर्गातून करोनाची लागण झाली हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसले तरी देखील राज्यासह मुंबईतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज १० ने वाढत आहे. जरी ही संख्या दुपट्टीने वाढली तर स्टेज ३ मध्ये पोहोचायला आणखी थोडासा कालावधीही पुरेसा ठरेल.

स्टेज ३ मध्ये पोहोचण्याची काय आहेत कारणे ?

- Advertisement -

सरकारच्या म्हणण्यानुसार, आपण सध्या स्टेज २ मध्ये आहोत. पण, स्टेज २ चे ज्या प्रतिबंधात्मक गोष्टी करायच्या आहेत आणि जशी सावधगिरी बाळगली पाहिजे तशी घेताना दिसत नाही. ज्यांना १४ दिवस होम क्वॉरंटाईन करायला सांगितले आहे ते सर्रास बाहेर फिरत आहेत. स्टेज २ मध्ये परदेशातून येणाऱ्या व्यक्तीकडून संसर्ग पसरण्याची भीती असते. पण, स्टेज ३ मध्ये परदेश दौऱ्याचा कोणताही इतिहास नसलेल्या व्यक्तीकडून ही संसर्ग पसरु शकतो. यात ही व्यक्ती अजून बऱ्याच लोकांना संसर्ग पसरवू शकते. ज्याला स्टेज ३ असं म्हटले जात असून कम्युनिटी स्प्रेड असंही म्हटलं जातं. पण, भारताचा आकडा अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही. जर आकडा असाच वाढत गेला तर आपण स्टेज ३ नक्की गाठू. जी भारतासाठी घातक पातळी ठरु शकते. त्यामुळे, सर्व सुचना आणि नियम हे पाळले गेले पाहिजेत.

स्टेज  ३ मध्ये जायचे नसेल तर काय कराल?

करोनाच्या प्रसारात स्टेज ३ मध्ये पोहोचायचे नसल्यास ज्यांना लक्षणे आहेत त्यांना क्वॉरंटाईन आणि १ ते ३ मीटरपर्यंत सुरक्षित अंतर पाळलेच गेले पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे. जर सरकारकडून दिलेल्या सुचना आणि नियम लोकांनी पाळले नाहीत तर आपण स्टेज ३ गाठू अशी भीती राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी व्यक्त केली आहे. म्हणून सरकारने कार्यालये, शाळा, कॉलेजेस आणि लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, या सर्व नियमांचे पालन करणे आताच्या घडीला सर्वात महत्त्वाचे आहे.

“ अजूनही सरकारने अधिकृतरित्या स्टेज ३ बद्दल माहिती दिली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही अजून याबद्दल जाहीर केले नाही. आतापर्यंत जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यांचा परदेश दौऱ्याचा प्रवास आहे किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना करोनाची लागण झाली आहे. पण, जर हा संसर्ग असाच पसरला आणि लोकांनी काळजी घेतली नाहीतर आपण स्टेज ३ मध्ये पोहोचायला वेळ लागणार नाही.  ”

डॉ. शिवकुमार उत्तुरे , अध्यक्ष, राज्य वैद्यकीय परिषद

- Advertisement -