घरदेश-विदेशजगात सर्वाधिक दोन कोटी मुले भारतात जन्माला येणार

जगात सर्वाधिक दोन कोटी मुले भारतात जन्माला येणार

Subscribe

युनिसेफने वर्तवला अंदाज

करोनाच्या महामारीने देशात मोठे संकट उभे राहिले असताना अजून एक संकट भारताचे दरवाजे ठोठावणार आहे. डिसेंबरअखेर जगातील सर्वाधिक मुले भारतात जन्माला येणार आहेत. पुढील नऊ महिन्यांमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त मुले भारतात जन्म घेतील, असा अंदाज युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संघटनेने वर्तवला आहे. करोनाच्या काळात गर्भवती माता आणि अर्भके यांना पुरेशी आरोग्यसेवा उपलब्ध न होण्याचा धोका असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यताही युनिसेफने व्यक्त केली आहे.

संपूर्ण जगाला करोनाचा विळखा पडला असताना जगभरात ११.६ कोटी मुले जन्म घेणार असल्याची माहिती युनिसेफने दिली आहे. ११ मार्चला ‘कोविड १९’ ही महामारी म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर ४० आठवड्यांच्या काळातील हे अपेक्षित जन्म आहेत. त्यातील सर्वाधिक २.०१ कोटी जन्म भारतात होणार असून दुसर्‍या क्रमांकावर चीन (१.३५ कोटी)आहे. त्यानंतर नायजेरिया(६४ लाख), पाकिस्तान(५० लाख) आणि इंडोनेशियाचा(४० लाख) क्रमांक लागतो. करोनाची महामारी येण्यापूर्वीही या देशांमध्ये नवजात अर्भकांचा मृत्यूदर खूपच मोठा होता. या काळात तो वाढण्याची शक्यता युनिसेफने वर्तवली आहे. या वर्षाच्या जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचा विचार केल्यास भारतात २.४१ कोटी मुले जन्माला येतील.

- Advertisement -

जगातील कोट्यवधी मातांना पालकत्वाच्या प्रवासात असताना आरोग्य केंद्रांत संसर्गाचे भय तसेच तातडीच्या मदतीसाठी आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसणे अशा अडचणींवर मात करत नवा जीव जन्माला घालण्याची तयारी करावी लागणार आहे, असे युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर यांनी म्हटले आहे. सध्या गरोदर महिलांना संसर्ग झाल्याचे फारसे आढळलेले नसले तरी संबंधित राष्ट्रांनी प्रसूतीदरम्यान आणि पश्चातही योग्य सेवा देण्याची गरज आहे.

करोनामुळे आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाल्यामुळे कोट्यवधी गर्भवती आणि गर्भवतींचा जीव धोक्यात असल्याचा इशारा युनिसेफने दिला आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशांतही हा धोका आहे.

- Advertisement -

नवजात शिशूंना काही आरोग्यविषयक समस्या असतील तर त्यांना तातडीने मदत मिळणे तसेच मुलांना स्तनपान, औषधे, लसी आणि पोषण या गोष्टी वेळेत मिळतील हे पाहणेही आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गर्भवती आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे फोर यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेत मार्च ते डिसेंबरपर्यंत ३३ लाख बाळांचा जन्म होण्याचा अंदाज वर्तवला आहे. लॉकडाऊन, टाळेबंदी, आरोग्य यंत्रणांकडून अपुरा प्रतिसाद, अन्नधान्य आणि औषधांचा अपुरा पुरवठा, प्रसूती सहाय्यक तसेच कुशल आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता या समस्यांना नवमाता आणि अर्भकांना सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -