राष्ट्रवादीचा २०वा वर्धापन दिन रक्तदान करुन साजरा करा; पक्षाचे आवाहन

Jayant Patil and Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे रक्तदान करण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जून हा वर्धापनदिन दरवर्षी उत्साहाने साजरा होत असला तरी कोरोना संकटामुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये, त्याऐवजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे राज्यभर आयोजन करण्यात यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.

कोरोना संकटामुळे हा वर्धापनदिन सार्वजनिकरित्या, मोठ्या प्रमाणावर साजरा करता येत नसला तरी वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे. राज्यातील रुग्ण, रुग्णालयांची रक्ताची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पक्षकार्यकर्त्यांनी स्वयंसेवी संस्था, नागरिकांच्या सहकार्याने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करावे, असे आवाहन कार्यकर्त्याना करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पडत नाही. परंतु राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया आणि अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी पुढे यावे, स्वत: रक्तदान करावे व इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे. रक्तसंकलनाच्या कार्यास हातभार लावावा, असे देखील या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस गेली २० वर्षे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि सर्वसमावेश विकासाच्या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून काम करत आहे. मागासवर्गीय, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पक्ष लढत आहे. पक्षाचे पुरोगामी, प्रगतशील विचार, पक्षाची ध्येय-धोरणे आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अधिकाधिक युवकांनी, युवतींनी, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी स्वत:ला जोडून घ्यावे. त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असेही जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.