घरताज्या घडामोडीJayshree Patil : गुन्हा दाखल झाल्यानंतर जयश्री पाटील फरार, एसटी कर्मचाऱ्यांचे ८०...

Jayshree Patil : गुन्हा दाखल झाल्यानंतर जयश्री पाटील फरार, एसटी कर्मचाऱ्यांचे ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर आता त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून जयश्री पाटील फरार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे ८० लाख रुपये घेतले असल्याचा आऱोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. वकील गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मध्यरात्री एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले. जयश्री पाटील फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केले असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे. कोर्टात युक्तिवाद करताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ८० लाख रक्कम घेतली आहे. परंतु ही रक्कम ३ कोटींपेक्षा जास्त असू शकते, सदावर्तेंच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये सर्व हिशोब लिहून ठेवला असल्याचा युक्तिवाद प्रदीप घरत यांनी केला आहे.

- Advertisement -

पवारांच्या घरावर हल्ला करण्यास जयश्री पाटलांनी सांगितले

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी वकील जयश्री पाटील यांनी सांगितले होते. अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. यामुळे कारवाई करण्याची तयारी करण्यात आली आहे. जयश्री पाटील फरार असल्याचे वकील घरत म्हणाले.

मध्यरात्रीच्या बैठकीला जयश्री पाटील उपस्थित

एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर जो हल्ला केला त्या हल्ल्यापूर्वी आधी गार्डनमध्ये आणि नंतर मध्यरात्री सदावर्ते यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीला एसटी कर्मचारी आणि काही महत्त्वाचे लोकं होते. सदावर्ते यांच्यासोबत जयश्री पाटीलसुद्धा बैठकीत होत्या. सदावर्तेंच्या घराच्या टॅरेसवर बैठक घेण्यात आली होती. जयश्री पाटील यांच्या सांगण्यावरुन आंदोलन करण्यात आले होते. हल्ल्याच्या आधी मध्यरात्री सदावर्ते, जयश्री पाटील, अभिषेक पाटील यांच्यात मध्यरात्री २.५० वाजता बैठक झाली होती असे पोलिसांच्या तपासात उघड झालं असल्याचे वकिल प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नागपूरच्या व्यक्तीकडून आंदोलनाची व्यवस्था

मुंबईत सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्यामध्ये नागपूरच्या व्यक्तीकडून व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनाच्या दिवशी नागपूरची व्यक्ती मुंबईत होती. सर्व गोष्टी तो व्यक्तीच हँडल करत होता. महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर उतरुन गटागटाने शरद पवारांच्या घराच्या ठिकाणी येण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. सिल्व्हर ओकजवळ असलेल्या गार्डनमध्ये जमा झाल्यावर नागपूरच्या व्यक्तीने माध्यमांना माहिती दिली असे पोलिसांच्या तपासात उघड झाले असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले आहे.


हेही वाचा : हल्ल्याआधी मध्यरात्री सदावर्तेंच्या घरी ST कर्मचाऱ्यांची बैठक, आक्रमक आंदोलनाबाबत चर्चा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -