घरमहाराष्ट्रजेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द

जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द

Subscribe

जेजुरीत येणार्‍या भाविकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची येत्या सोमवारी म्हणजे २० जुलैला यात्रा आहे. मात्र, कोरोनामुळे जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ-मानकरी मंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. मात्र, दरवर्षीप्रमाणे वाजत-गाजत पालखी खांद्यावर घेऊन कर्‍हा समात्र नित्य सेवेकरी, मानकरी यांच्या हस्ते खंडोबाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन करून धार्मिक विधी करणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने जेजुरी शहर व परिसर कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. १४ दिवस जेजुरी शहर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्या अनुषंगाने जेजुरी येथील सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आला. शिवाय, परंपरेनुसार कर्‍हास्नानासाठी गडावरुन प्रस्थान होणारा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. नित्य सेवेकरी, पुजारी, मानकरी यांचे हस्ते सोमवती उत्सवाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. सोमवारी खंडोबा-म्हाळसादेवीची उत्सवमूर्ती सजवण्यात आलेल्या चार चाकी वाहनातून कर्‍हा नदीवर नेण्यात येणार आहेत. त्याठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून मूर्तींना अभिषेक, स्नान घालण्यात येणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांना ‘रोजमुरा’ (ज्वारी) घरपोच वाटप करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फिंगर क्षेत्रातून मागे हटण्यास चीनचा नकार


येत्या २० जुलैला सोमवती अमावस्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी ग्रामस्थ मंडळाने बैठक बोलावली होती. यावेळी प्रमुख वतनदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे,जेजुरीचे सहा. पोलीस निरिक्षक अंकुश माने, देवस्थानचे मुख्य विश्वस्त संदीप जगताप ,विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, ग्रामस्थ मंडळाचे छबन कुदळे, जालिंदर खोमणे, रामदास माळवदकर, कृष्णा कुदळे, आबा राऊत, अमोल शिंदे, काशिनाथ मोरे, अविनाश सातभाई, माजी विश्वस्त सुधीर गोडसे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

भाविक जेजुरीत आल्यास कारवाई

भाविकांना देवदर्शन बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी शहरात येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -