घरमहाराष्ट्रनाशिकराज्यातील या ऐतिहासिक गावात काळाराम-गोराराम एकाच मंदिरात

राज्यातील या ऐतिहासिक गावात काळाराम-गोराराम एकाच मंदिरात

Subscribe

आज श्रीरामनवमी असून देशात सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. राज्यात शिर्डीचे साईबाबा मंदिर, नाशिकमधील काळाराम मंदिर, सज्जनगड, गोंदवले याठिकाणी आज मोठा उत्सव असतो. लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रसिद्ध आहे. येथील मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. नाशिकमध्येच गोराराम मंदिरही आहे. येथील मूर्ती संगमरवरी आहे. मात्र नाशिकपासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक विंचूर या गावात काळाराम आणि गोराराम अशा दोन्ही मुर्ती एकाच मंदिरात पाहायला मिळतात. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या दोन प्रकारच्या मूर्ती एकाच मंदिरात असल्याचे हे दुर्मीळ उदाहरण आहे.

दीडशे वर्षापूर्वी या मंदिराची उभारणी

निफाड तालुक्यातील विंचूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. साताऱ्याच्या छत्रपती शाहू यांचे निष्ठावंत सरदार विठ्ठल शिवदेव उर्फ सरदार विंचूरकर यांचे हे गाव. या गावात त्यांचा जुना वाडा आजही इतिहासाची साक्ष देतो. पानिपतच्या लढाईत पराक्रम गाजविलेल्या सरदार विंचूरकरांनी विंचूर गावात जवळच्या टेकडीवरून त्या काळात भूमिगत तंत्राचा वापर करून पाणी आणले होते. गावातील तो हौद उन्हाळ्यातही विंचूरकरांना पाणीपुरवठा करत असे. धार्मिक प्रवृत्तीच्या विंचूरकरांनी गावात काही मंदिरे बांधली होती. श्रीरामाचे मंदिर त्यापैकीच एक. नाशिकच्या काळाराम आणि गोरेराम या दोघांचे दर्शन घेता यावे म्हणून सुमारे दीडशे वर्षापूर्वी या मंदिराची उभारणी केली. काळाराम आणि गोरेराम या दोघांच्या नयनरम्य मूर्ती येथे आहेत. त्याकाळी रमाबाई गोसावी यांच्याकडे मंदिराची जबाबदारी होती.

- Advertisement -
काळाराम आणि गोराराम एकत्र

याही रामाला घडला 14 वर्षे वनवास

1990 पर्यंत गावातील या राममंदिराची व्यवस्था गोसावी कुटुंबाकडे होती. मात्र त्यांच्यात अंतर्गत वाद झाले आणि मंदिराची पूजा अर्चा बंद झाली, मंदिरही बंद झाले. पुढे पुढे तर मंदिराची पडझड होऊन येथे गवत वगैरे वाढले. त्यानंतर गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येऊन मंदिर सुरू होण्यासाठी कोर्टात लढा दिला. 14 वर्षानंतर या ग्रामस्थांच्या बाजूने निकाल लागला. त्यानुसार मंदिराची व्यवस्था त्यांच्याकडे सोपविण्यात आली. या लढ्यात सरदार विंचूरकरांच्या पदरी राजवैद्य, किर्तनकार म्हणून असलेले हरि दादाजी जोशी यांचे नातू डॉ. रामचंद्र भास्कर जोशी यांच्यासह बापू जोशी, नंदकुमार जोशी, राजेंद्र जोशी यांचा मोलाचा वाटा होता. सुमारे 2004 साली या मंदिराचा लोकवर्गणीद्वारे पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला आणि वनवासात असलेल्या रामाच्या दोन्ही मूर्ती दर्शनासाठी खुल्या झाल्या.

- Advertisement -
मंदिरासमोरचा दास मारूती

सध्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराची व्यवस्था होते. अलिकडेच मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून सभामंडपाचे काम सुरू आहे. रामाच्या समोरच दासमारूतीची मूर्ती असल्याची माहिती कृष्णा जोशी यांनी दिली. दैनंदिन पूजाअर्चेव्यतिरिक्त रामनवमीचे नवरात्र येथे मोठ्या उत्साहात पार पडते. नऊ दिवसांच्या काळात भजन-किर्तन-हरिनाम असा उत्सव होतो. याशिवाय एकादशीला महापूजन होते. रोजचा हरिपाठही सुरू असून 87 वर्षांचे डॉ. रामचंद्र जोशी मंदिराची व्यवस्था पाहतात, त्यांचे कुटुंबिय आणि इतर ग्रामस्थांची त्यांना मदत मिळते. मागील 5-6 वर्षांपासून हे मंदिर विंचूरसह तालुक्यातील रामभक्तांच्या श्रद्धेचा विषय ठरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -