घरमहाराष्ट्रLok sabha Election 2024 : कर्जतमधील ‘कल्पतरू’चा वाद मतदानाच्या मुळावर!

Lok sabha Election 2024 : कर्जतमधील ‘कल्पतरू’चा वाद मतदानाच्या मुळावर!

Subscribe

नेरळ : कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या कल्पतरू कंपनीच्या प्रकल्पात काम मिळत नसल्याने कल्पतरू विरुद्ध स्थानिक ग्रामस्थ असा वाद पेटला असून, त्यातून कोणताच तोडगा दृष्टीपथात नसल्याने हा वाद येत्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या मुळावर येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून, राजकारण्यांपासून प्रशासनापर्यंत सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

‘सेकंड होम’ फंड्यामुळे कर्जत शहर आणि तालुक्यात दुसरे घर घेण्याकडे मुंबई, पुण्यासह अनेक शहरांतील धनिक, मध्यमवर्गीय नागरिकांचा कल वाढला आहे. स्वाभाविक तालुक्यात मोठाले गृहप्रकल्प सुरू असून, काही गृहप्रकल्प येऊ घातले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Lok Sabha Election 2024 : पेणमधील वीटभट्टी-हॉटेलमालक ७ मे रोजी काय करणार?

अशापैकी ‘कल्पतरू’ या कंपनीने गृहप्रकल्पासाठी खोपोली-कर्जत-शहापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्जत शहराला लागून नांगुर्ले, तिघर, वर्णे या गावांतील ११० एकर जमीन खरेदी केली असून, काम देखील सुरू केले आहे. एखादा प्रकल्प गावात आला तर त्या प्रकल्पसोबत अनेक रोजगाराच्या संधी चालून येत असल्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला दिल्या. कंपनी व्यवस्थापनाने नांगुर्लेसह इतर ग्रामस्थांना प्रकल्पात काम (रोजगार) देण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात आजवर ग्रामस्थांना कामासाठी कंपनीने प्रकल्पात सामावून घेतलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : आम्हाला ‘इलेक्शन ड्युटी’तून मुक्त करा!

सहा महिने केवळ आश्वासनावर अवलंबून असलेले नांगुर्ले ग्रामस्थ आक्रमक झाले आणि आता आश्वासन नको थेट कार्यवाही हवी असे सांगत कुटुंबासह साखळी उपोषणाला बसले होते. आता माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र तरीही ग्रामस्थांना काम देण्यात आलेले नाही. अनेकदा ग्रामस्थांचा कंपनी व्यवस्थापनाबरोबर संघर्ष झाला.

ग्रामस्थांनी गेले वर्षभर कल्पतरू आरिया प्रकल्पामध्ये काम मिळविण्यासाठी उपोषण, आंदोलन, अर्ज, विनंत्या, बैठका आदींचा मार्ग अवलंबला. तरीही ग्रामस्थांना कंपनी व्यवस्थापनाने जुमानले नाही. आता महायुतीमधील शिंदे गटाचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आम्हाला राजकीय भावनेने विरोध करीत असून, कंपनी व्यवस्थापनावर दबाव आणून कोणत्याही प्रकारे काम मिळू नये, अशी विरोधी भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना काम मिळू नये म्हणून कंपनीवर दबाव टाकला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यामुळे नांगुर्ले, तिघर येथील कार्यकर्ते, शेतकरी अशा साधारण २ हजार ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. ग्रामस्थ आणि कल्पतरूच्या वादात मध्यस्थीचे प्रयत्न होत असले तरी ग्रामस्थ ‘प्रथम आमच्या हाताला काम द्या’ या मागणीवर ठाम असल्याने हे ग्रामस्थ आपलेच असे मानणारे नेते हवालदिल झाले असून, दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -