घरमहाराष्ट्रलाठीमार हेच कारण... तीन मोठ्या घटनांमुळे तीन पक्षांचे सरकार अडचणीत येण्याची चिन्हे

लाठीमार हेच कारण… तीन मोठ्या घटनांमुळे तीन पक्षांचे सरकार अडचणीत येण्याची चिन्हे

Subscribe

मुंबई : जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याला आगामी लोकसभा निवडणुकांची किनार असल्याने या फैरींची धार आणखी तीव्र झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या अशा लाठीमाराच्या तीन मोठ्या घटनांमुळे शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधक पुन्हा एकवटले आहेत. देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट दाखविली आहे. विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची बैठक गुरुवारी (31 ऑगस्ट) आणि शुक्रवारी (1 सप्टेंबर) मुंबईत झाली. ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित ह़ॉटेलमधील बैठकीत आघाडीच्या समन्वय समितीबरोबरच इतर काही समित्यांबाबत जाहीर करण्यात आल्या.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज: मराठा महासंघाने लावले फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले- …

एकीकडे ही घडामोड घडत असतानाच जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत बेमुदत उपोषणाला बसले होते. काल, शुक्रवारी पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या घटनेचे हिंसक पडसाद आता राज्यातील विविध भागांमध्ये उमटायला सुरुवात झाली असून या प्रकरणामुळे अनेक जिल्ह्यांत बंदची हाक देण्यात आली आहे.

- Advertisement -

या लाठीमाराच्या घटनेवरून विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे. जालन्यात झालेल्या ह्या अमानवीय घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. तर, याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, माझी विरोधी पक्षांना विनंती आहे. वाहत्या गंगेत हात धुऊ नका, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा – …मी गप्प बसणार नाही, जालन्यातील घटनेनंतर छत्रपती संभाजी राजेंची आक्रमक भूमिका

पण लाठीमाराची ही पहिलीच घटना नाही. गेल्या सहा महिन्यांतील ही तिसरी मोठी घटना आहे. या आधा जूनमध्ये पोलिसांनी आळंदी येथे वारकऱ्यांवर लाठीमार केला होता. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान पोलीस आणि वारकरी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर वारकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. मंदिर व्यवस्थापनाने केवळ मानाच्या पालख्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वारकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली, असे सांगण्यात आले.

तर, त्याच्याही आधी एप्रिल महिन्यात कोकणातील रिफायनरी प्रकल्पाविरोधातही आंदोलनाचा भडका उडाला होता. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करीत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपले आंदोलन तीव्र केले होते. त्यामुळे राज्य शासनाकडून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 28 एप्रिल 2023 रोजी मोर्चा काढू पाहणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यात काही आंदोलक जखमी झाले होते.

हेही वाचा – जालन्यातील घटनेवरून उद्धव ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा, म्हणाले – “एक फुल, दोन हाफ…”

विशेष म्हणजे, त्यावरून राजकीय आरोपांची राळ अजूनही उडवली जात आहे. या आंदोलनात कोल्हापुरातील नागरिक सहभागी झाले होते, असा दावा विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लाठीमाराच्या दिवशी केला होता. तर, बारसू आंदोलनातील लोकांना बंगळुरूमधून आर्थिक रसद पुरविली जात असल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता.

कोल्हापूर, मुंबईतही लाठीमाराच्या घटना

जूनमधील शिवराज्याभिषेकदिनी व्हॉट्सअप स्टेटसला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो ठेवल्यावरून वातावारण तापले होते. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनकडून एकत्र येत मोर्चा काढण्यात आला. पण या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला होता.

मुंबईत ऑक्टोबर महिन्यात विविध मागण्यांसाठी सांताक्रूझ बस डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली होती. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी या आंदोलकांवर सौम्य लाठीमार तसेच त्यांची धरपकडही केली होती.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -