घरCORONA UPDATEविधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू; अधिसूचना जारी, २१ मे रोजी निवडणूक

विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू; अधिसूचना जारी, २१ मे रोजी निवडणूक

Subscribe

अधिसूचना निघाल्याने इच्छुक उमेदवारांना आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकेल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ११ मे अशी आहे.

येत्या २१ मे रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. या निवडणुकीसाठी विधानभवनातून आज अधिसूचना जारी करण्यात आली. अधिसूचना निघाल्याने इच्छुक उमेदवारांना आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकेल. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ११ मे अशी आहे.

निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान आघाडी आणि भाजपच्या छोट्या घटक पक्षांनी जागांची मागणी लावून धरली आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी भाजपकडे तर जोगेंद्र कवाडे यांनी काँग्रेसकडे एक जागा देण्याचा आग्रह धरला आहे.

- Advertisement -

दरम्यान, विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी सर्वच पक्षात चुरस आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे  येत्या बुधवार किंवा शुक्रवारी अर्ज दाखल करतील. सेनेत दुसऱ्या जागेसाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित मानले जाते. काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता असून तेथे माजी मंत्री नसीम खान, अनिस अहमद, मुजफ्फर हुसेन, चारूलता टोकस अशी नावे चर्चेत आहेत.

भाजपमध्ये संभाव्य उमेदवारांच्या एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता या माजी मंत्र्यांसह रणजितसिंह मोहिते- पाटील, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील अशा वजनदार नावांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीत शशिकांत शिंदे, सुरेखा ठाकरे, शिवाजीराव गर्जे, अदिती नलावडे, महेश तपासे आदी नावांची चर्चा आहे.

- Advertisement -

विधानपरिषदेतून निवृत्त झालेले सदस्य

नीलम गोऱ्हे (शिवसेना), पृथ्वीराज देशमुख, अरुण अडसड, स्मिता वाघ (भाजप), किरण पावसकर, हेमंत टकले, आनंद ठाकूर (राष्ट्रवादी काँग्रेस), चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड (काँग्रेस)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -