नासलगावी बिबट्याचा हल्ला; एक गंभीर, नागरिक भयभीत

नाशिकरोड : बिबट्याचे हल्ले काहीकेल्या थांबायचे नाव घेत नाहीये. सोमवारी दुपारी पुन्हा तालुक्यातील नासलगाव येथे बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची  धक्कादायक घटना घडली.

leopard
नाशिक तालुक्यातीक पश्चिम पट्ट्यातील नासलगाव येथे सोमवारी दुपारी १२ वाजता बिबट्या आढळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ झुडपात बिबट्या दडून बसल्याची बातमी गावच्या ग्रामसेविका वैशाली बागुल यांनी वन विभागाचे अधिकारी ओमकार देशपांडे यांना कळवली. मात्र, विलंबाने वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान वन विभागाचे न ऐकता ग्रामस्थांनी त्याला हुसकावण्याचा किंबहुना आरडाओरड करत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र भेदरलेल्या बिबट्याने वेगाने झडप घालत एका व्यक्तीला जखमी केल्याची घटना घडली. शांताराम बाळू दोभाडे (३०) असे त्यांचे नाव असून त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. रविवारी सायंकाळी सामनगाव परिसरात चिमुरड्यावर हल्ला झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा आज सकाळी ही घटना घडल्याने वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वन विभागाकडून त्यांच्याकडील सर्व पिंजरे सामानगाव भागात लावल्याचे सांगण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत स्थानिक नागरिक भारती दिवे, सुरेश दिवे, काशीनाथ दिवे यांनी तीव्र चिंता व्यक्त करत वन विभागाने तातडीने नासलगाव येथे पिंजरा लावावा व गावात वन कर्मचारी तैनात करावा, अशी मागणी केली आहे.