घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच उतावळे इच्छुक स्वत:च चढले उमेदवारीच्या...

Lok Sabha 2024 : जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच उतावळे इच्छुक स्वत:च चढले उमेदवारीच्या बोहल्यावर

Subscribe

मविआ आणि महायुतीमधील इच्छुक उमेदवारांनी जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर केली असल्याचे पाहायला मिळत आहे. यांमुळे राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, राज्यात अद्याप तरी महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांना कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील इच्छुक उमेदवारांनी जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर केली असल्याचे पाहायला मिळत आहे. यांमुळे राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. (Lok Sabha 2024: Aspiring candidates for Lok Sabha have announced their candidature before seat allotment)

हेही वाचा… NCP-SP : डिजिटल इंडिया धोरण स्वत:साठी जोरात, एनसीपी-एसपीचे भाजपावर शरसंधान

- Advertisement -

महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोन्हींमधील अनेक उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायच्या तयारीत आहे. परंतु, मर्यादीत जागा असल्याने आणि इच्छुक अनेक असल्याने याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. हा पेच अद्याप तरी सोडविण्यात यश आलेले नाही. त्याचमुळे अनेक जण आपल्या नावांची स्वतःच घोषणा करत आहेत. चंद्रपूर लोकसभेच्या जागेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. कारण चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर असतील की शिवानी वडेट्टीवार असतील, याबाबत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. पण, असे असतानाही प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर केली आहे.

प्रतिभा धानोरकर या गेल्या काही दिवसांपासू चंद्रपूर लोकसभेवर आपला दावा सांगत आहेत. यासाठी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे त्यांच्या मुलीसाठी म्हणजेच शिवानी वडेट्टीवार हिच्यासाठी पक्षश्रेष्ठींना गळ घालत असल्याची चर्चा आहे. पण याचमुळे की काय आता, प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर केली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी X सोशल मीडिया साइटवर असलेल्या त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून पोस्ट करत म्हटले आहे की, ” आज काळ आणि वेळ बदलली असली तरी परिस्थिती बदलली नाही. आपली उमेदवारी फिक्स आहे. फक्त या हक्काची आणि न्यायाची उमेदवारी आपल्या हाती येईपर्यंत आपण सर्वांनी थोडं धीराने वागायचं आहे आणि त्यानंतर मैदान गाजवायचं आहे.”

- Advertisement -

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. ते काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार होते. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद आहे. त्या ठिकाणी आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. पण पक्षाकडून या जागेचा तिढा सुटत नसल्याचे पाहायला मिळाल्यानंतर धानोरकरांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. “उमेदवारी आपली, विजय आपला” अशाही पोस्ट त्यांच्याकडून करण्यात येत आहेत.

प्रतिभा धानोरकर या केवळ एकमेव नाही ज्यांनी आपली उमेदवारी स्वतः जाहीर केली आहे. तर मविआत असे अनेक इच्छुक नेते मंडळी आहेत. ज्यांनी अप्रत्यक्षपणे स्वतःची उमेदवारी घोषित करत जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, काँग्रेसचे विश्वजीत कदम व अन्य काही नेत्यांकडून आपली उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे आता मविआची डोकेदुखी वाढली आहे. पण यामुळे मविआमध्ये वादाची ठिणगीही पडत असल्याने लोकसभेच्या जागा घोषित झाल्यानंतर मविआत नेमके काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खासदार श्रीकांत शिंदेंकडूनही परस्पर उमेदवार जाहीर…

तर दुसरीकडे, महायुतीकडूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला घोषित करण्यात आलेला नाही. पण तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून परस्पर उमेदवारांची नावे घोषित करण्यात येत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आतापर्यंत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर अप्रत्यक्षपणे अनेक सभांमधून त्यांनी अनेक जागांवर शिवसेनेचा दावा सांगितला आहे.

बारामतीमुळे महायुतीत वादाची ठिणगी…

तर, बारामती लोकसभा मतदारसंघात तर मोठा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवारांना जागा सुटावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याप्रमाणे बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यातही सुनेत्रा पवारांना मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण यामुळे शिवेसना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांना लक्ष्य केले आहे, पण युती धर्म पाळावा लागेल असे त्यांना मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानता शिवतारे यांनी अजित पवारांविरोधातील आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. तर त्यांनी आपण बारामतीकरांच्या हितासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरणारच आहोत, असे जाहीर केले आहे. ज्यामुळे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -