घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरBreaking : ना कोणती पार्टी ना कोणता पक्ष अफसर खान लढणार अपक्ष;...

Breaking : ना कोणती पार्टी ना कोणता पक्ष अफसर खान लढणार अपक्ष; वंचितपासून उमेदवार का जात आहे दूर?

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. अफसर खान यांनी पत्रकार परिषद घेऊन या संबंधीची माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीसोबत त्यांचे काय बिनसले की स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला, याबद्दल त्यांनी बोलणे टाळले. आज (बुधवार) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.  वंचित बहुजन आघाडीसोबत काय बिनसले याची माहीत 27 तारखेला पुन्हा पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचा ए-बी फॉर्म अद्याप अफसर खान यांना मिळालेला नाही. याचे कारण काय आहे, याबद्दल शनिवारी सविस्तर बोलणार असल्याचे ते म्हणाले. जळगाव, सोलापूर आणि आता औरंगाबाद असे एकानंतर एक मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पक्षापासून फारकत घेत आहेत.

कोण आहेत अफसर खान?

छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मजबूत संघटन आहे. या संघटनेच्या बळावरच 2019 मध्ये एमआयएम आणि वंचित आघाडीचे इम्तियाज जलील येथून विजयी झाले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला एमआयएम-वंचित आघाडीने मागील निवडणुकीत ताब्यात घेतला. यात वंचित बहुजन आघाडी या कॅडरबेस असलेल्या पक्षाचा मोठा वाटा होता. पक्षाची हीच ताकद लक्षात घेऊन अफसर खान यांनी वंचितमध्ये प्रवेश केला होता. मात्र 22 दिवसांमध्येच त्यांनी वंचितपासून फारकत घेतली आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या राजकारणात सक्रीय असलेले अफसर खान हे काँग्रेसकडून महापलिकचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत. शहरातील बेगमपुरासह मुस्लिम बहूल वार्डांमध्ये त्यांचे वर्चस्व आहे. शहर आणि जिल्ह्यातही त्यांचा संपर्क आहे, याचाच फायदा घेण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यांना उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी वंचित बहुजन आघाडीचे जुने नेते, कार्यकर्ते उपस्थित नव्हते. पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीतील नेत्यांची गैरहजेरी तेव्हाही चर्चेचा विषय ठरली होती.

हेही वाचा : VBA : वंचितच्या उमेदवारांचा माघार घेण्याचा सिलसिला कायम; सोलापूरनंतर या जिल्ह्यातही उमेदवाराची माघार

- Advertisement -

तीन दिवसांत तीन उमेदवारांनी सोडली वंचितची साथ

वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्याआधी जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. या दोन्ही उमेदवारांनी निवडून येण्याची शाश्वती दिसत नसल्याचे जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले होते. गायकवाड यांनी म्हटले होते की, पक्षाने मला बंदूक तर दिली मात्र त्यात गोळ्याच दिल्या नाहीत, तर लढू कसा, असा सवाल केला होता. सोलापूरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी साथ दिली नसल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी निवडून येण्याची शाश्वती दिसत नसल्याचे सांगितले होते. यावर पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंनी गायकवाड आणि लोढा यांना विरोधी पक्षाकडून धमक्या येत होत्या त्यामुळे त्यांनी माघार घेतल्याची सारवासारव केली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षातून आलेल्या उपऱ्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीच्या बोहल्यावर चढवणाऱ्या वंचितने आता उमेदवार त्यांना सोडून का जात आहे, याचा शोध घेतला पाहिजे अशी चर्चा सुरु झाली आहे.

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -