घरमहाराष्ट्रलोकसभा निवडणूक २०१९: राज्यात शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला!

लोकसभा निवडणूक २०१९: राज्यात शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला!

Subscribe

लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला असून आता सोमवारी म्हणजेच २९ एप्रिलला एकूण १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

देशभरातील लोकसभा निवडणुकांसाठीच्या चौथ्या आणि महाराष्ट्रातील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी ५ वाजता संपला. राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये २९ एप्रिल म्हणजे सोमवारी मतदान होणार आहे. तर देशभरातल्या एकूण ९ राज्यांतल्या ७१ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. राज्यातला हा चौथा आणि शेवटचा टप्पा असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद राज्यात पणाला लावली होती. विशेष म्हणजे, या चौथ्या टप्प्यामध्ये काही महत्त्वाच्या मतदारसंघांतल्या बिग फाईट्सही होणार असल्यामुळे या टप्प्याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे. मुंबईल्या सर्वच मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

कुठे होणार मतदान?

चौथ्या टप्प्यात राज्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई अशा १७ जागांसाठी सोमवारी मतदान होईल. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवार मैदानात आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणू प्रतिष्ठेची ठरणार आहे. विशेषत: मुंबईतले सगळे ६ मतदारसंघ, शिरूर, ठाणे, कल्याण आणि नाशिक या मतदारसंघांवर तिथल्या मोठमोठी नावं असलेल्या उमेदवारांमुळे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

- Advertisement -

प्रचार जोमात, दिग्गज फॉर्मात!

या चौथ्या टप्प्यामध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांमुळे मोठी चर्चा सुरू झाली ती भाजपविरोधातल्या हवेची. त्यामुळे शिवसेनेनेही आपला प्रचार करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. भाजपदेखील पूर्ण तयारीनिशी प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावल्याचं चित्र होतं. खुद्द मुख्यमंत्रीच विरोधकांवर आणि विशेष म्हणजे एकही उमेदवार नसलेल्या राज ठाकरेंवर आगपाखड करत होते. तिकडे विरोधकांकडूनही जोर लावण्यात आला होता. शरद पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे अशी दिग्गज मंडळी महाराष्ट्रभर प्रचार करत होती. त्यामुळे या टप्प्याचा कौल कुणाच्या बाजूने जातो, याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल.


हेही वाचा – मोदी-शहांवर राज ठाकरेंचा नाशिकमध्ये शेवटचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

निवडणूक यंत्रणाही सज्ज!

एकूण १७ मतदारसंघांमध्ये ३ कोटी १२ लाख मतदार या क्षेत्रामध्ये येतात. यामध्ये १ कोटी ६६ लाख ३१ हजार मतदार हे पुरूष असून १ कोटी ४५ लाख ५९ हजार महिला आहेत. या चौथ्या टप्प्यामध्ये तृतीयपंथी उमेदवार आणि मतदारांची संख्याही मोठी असून एकूण ३३२ तृतीयपंथी मतदार मतदान करणार आहेत. महाराष्ट्रातल्या मतदानासाठीचा हा शेवटचा आणि सर्वात मोठा टप्पा असल्यामुळे निवडणूक यंत्रणाही कंबर कसून कामाला लागली आहे. एकूण १०२ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून १ लाख ७ हजार ९९५ इव्हीएम तर ४३ हजार ३०९ व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आली आहेत. एकूण ३३ हजार ३१४ मतदान केंद्र या १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -