घरमहाराष्ट्रकोरोना नियमांचे पालन करत राज्यात माघी गणेशोत्सवास सुरूवात

कोरोना नियमांचे पालन करत राज्यात माघी गणेशोत्सवास सुरूवात

Subscribe

कोविड प्रोटोकॉल माघी गणेशोत्सवासाठीही असणार लागू

राज्यभरात कोरोना व्हायरसचं संकट असल्याने सर्वच सण-उत्सव साधेपणाने साजरा होत आहेत. कोरोनाचं संकट असले तरी सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी माघी गणेशोत्सव उत्साहात सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मंडळांनी साधेपणाने माघी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या नियमांचे पालन करत माघी गणेशोत्सव साजरा करू, असे माघी गणेशोत्सव मंडळांकडून सांगितले जात आहे. तर यंदाच्या वर्षासाठी माघी गणेशोत्सवाकरिता पीओपीच्या गणेशमूर्तीवर बंदी नाही. मात्र भाद्रपदातील गणेशोत्सवाकरिता लागू असलेले बहुतांश कोविड प्रोटोकॉल माघी गणेशोत्सवासाठीही लागू असणार आहेत. सर्व गणेशभक्तांनी सहकार्य करावे आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करत उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने नागरिकांना केले आहे.

राज्यभरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह असून भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघी गणेशोत्सवात भाविकांचा उत्साह यंदा दिसतोय. मात्र राज्यात असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील श्री सिद्धीविनायक गणपती आणि पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात भाविकांची रीघ पाहायला मिळाली. राज्यातील सर्वच गणपती मंदिरात गणेशोत्सवाचा उत्साह असून माघी गणेशोत्सव मंडळं देखील कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसताय.

- Advertisement -

चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते, भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी असले तरी माघी गणेशोत्सव राज्यभरात साजरा होताना दिसतो.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -