Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Mahad Landslide: मृतदेहांचे स्पॉट पोस्ट मार्टम होणार

Mahad Landslide: मृतदेहांचे स्पॉट पोस्ट मार्टम होणार

Related Story

- Advertisement -
सततच्या पावसामुळे गेल्या दोन दिवसात महाड येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक भागात अतिवृष्टी झालेली आहे. गुरुवार संध्याकाळी 6.00 वाजता तळीये गाव (वरची वाडी) तालुका महाड येथे अचानक दरड कोसळल्याने जवळपास 30 घरे ढिगाऱ्याखाली गेली. आज दुपारी 1.00 वाजेपर्यंत 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तसेच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे-सुतारवाडी ता. पोलादपूर गावातील 5 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. अशा एकूण 37 मृतदेहांचे शवविच्छेदन जागेवरच (Spot Post Mortem) करण्यात येणार आहेत.
यानंतरही अजूनही काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असून शोधकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. तसेच महाडमध्ये 7 ते 8 फूटावर खूप उंचीवर पाणी साचलेले असून अद्यापही जखमी रुग्ण सापडलेले नाहीत व उंच ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत, त्यांना हेलिकॉप्टरने स्थलांतरित करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे.
एमआयडीसी बिरवाडी, महाड येथे दोन कंपन्यांमध्ये स्फोट होवून आग लागल्याची घटना घडली होती परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आलेले आहे. तसेच मागील 2 दिवसापासून विद्युत पुरवठा बंद असल्याने महाड येथील खाजगी व शासकीय डॉक्टर्स यांच्याशी संपर्क होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे महाड येथील कोविड सेंटर (सीसीसी / डिसीएचसी) सेंटरमधील रुग्ण सुरक्षित असून जिल्हा स्तरावरुन व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथून औषधांचा व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक औषधोपचारही सुरु आहेत. उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे 37 रक्तपिशव्या उपलब्ध असून 50 रक्तपिशव्यांची अलिबाग जिल्हा रुग्णालय येथून मागणी करण्यात आली आहे.
गंभीर जखमी रुग्णांना (Poly Trama) एम.जी.एम. कामोठे, जिल्हा रुग्णालय अलिबाग व गरज भासल्यास जे.जे. रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. स्थिर व किरकोळ जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव व जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात येत आहे. विविध स्वयंसेवी संस्थेमार्फत गरजूंना पाणी, जेवणाची पाकीटे व औषधांचा पुरवठा करण्यात येत असून शवविच्छेदन करण्यासाठी 1) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील तज्ञपथक (न्यायवैद्यक तज्ञ) डॉक्टरांसह 2) उपजिल्हा रुग्णालय, म्हसळा, 3) उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन, 4) उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे चार वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. पालकमंत्री कु.आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांनी महाड येथे पाहणी करून जखमींची विचारपूस करून सर्व संबंधीत विभागांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे.

हेल्पलाईन क्रमांक

तसेच वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत संपर्कासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य हेल्पलाईन नं. 02140-263006/263003, डॉ. प्रदीप इंगोले, वैद्यकीय अधीक्षक (नोडल ऑफिसर) मो.नं.9130733202/8369424489, सनियंत्रण अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अलिबाग रायगड मो.नं. 9404001000 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

- Advertisement -