घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहानगर इंपॅक्ट : त्र्यंबकेश्वरचे 'ते' आरक्षणावरील अनधिकृत बांधकाम थांबवले; चौकशीचेही आदेश

महानगर इंपॅक्ट : त्र्यंबकेश्वरचे ‘ते’ आरक्षणावरील अनधिकृत बांधकाम थांबवले; चौकशीचेही आदेश

Subscribe

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील आरक्षित जागेवर माजी नगरसेवक कैलास चोथे यांनी केलेले अनधिकृत बांधकाम ‘आपलं महानगर’च्या दणक्याने तात्काळ थांबवण्यात आले आहे. तसे आदेश त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश जाधव यांनी दिले असून, तशी नोटीस चोथे यांना बजावण्यात आली आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकार्‍यांनीही ‘आपलं महानगर’च्या वृत्ताची दखल घेत दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या गजानन महाराज मंदिरालगत कैलास चोथे यांनी ७.७७ गुंठे जागा विकत घेऊन त्यावर बेकायदेशीरपणे इमारतीचे बांधकाम केले आहे. ज्या जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्यावर नगरपरिषदेने शॉपिंग सेंटर आणि पार्किंगचे आरक्षण टाकलेले आहे. संबंधित जागेवर नगरपरिषदेचे आरक्षण असल्याचे चोथे यांना यापूर्वी माहिती होते. असे असताना त्यांनी शासनाची कुठलीही तमा न बाळगता इमारतीचे बांधकाम केले. याबाबतचे वृत्त ‘आपलं महानगर’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यांनी चोथे यांना इमारतीचे बांधकाम थांबवण्यासाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात अधिक माहिती घेतली असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. चोथे यांनी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे त्र्यंबक शहरात आणखी किती बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

- Advertisement -

काय म्हटले आहे नोटीसमध्ये?

नगरपरिषदेने चोथे यांना दिलेल्या नोटीसमध्ये गट नंबर २७४ पैकी नगरपरिषदेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम सुरू केल्याचे स्पष्ट म्हटले आहे. नगर परिषदेची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम करू नये. सदरचे कृत्य बेकायदेशीर व नगरपरिषद अधिनियम १९६५ व महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२,५३, ५४ चे उल्लंघन करणारे आहे. सदर बांधकाम बंद करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, चोथे प्रकरणावरून त्र्यंबक शहरात आधी बेकायदेशीर बांधकाम करा मग शासकीय सोपस्कार पूर्ण करा असा नवीन पायंडा पडला की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

कैलास चोथे यांना बांधकाम थांबवण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली असून, या जागेवर पूर्वीही बांधकाम होते की काय याची शहानिशा केली जाईल. त्यांचे कागदपत्र आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. : प्रकाश जाधव, मुख्य अधिकारी, त्र्यंबक नगर परिषद

‘आपलं महानगर’च्या वृत्ताची दखल घेत सदरच्या बांधकाम प्रकरणावर त्र्यंबक मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना तातडीने उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत हा अहवाल प्राप्त होईल. सदर प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल. यात कुणी दोषी आढळल्यास त्याला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. : बाबासाहेब पारधे, अपर जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -