घरमहाराष्ट्रशाब्बास देवेंद्र!

शाब्बास देवेंद्र!

Subscribe

 एकदा सत्ता दिली की, पुन्हा सत्ता द्यायची नाही असा ट्रेंड सध्या देशात असताना महाराष्ट्र आणि हरयाणात भाजपला मोठ्या बहुमताने तेथील जनतेने पुन्हा सत्ता दिली आहे. त्यासाठी मी या दोन राज्यातील जनतेचे आभार मानतो, असे सांगताना महाराष्ट्रात पुन्हा भाजपच्या नेतृत्त्वाखालील युतीने सत्ता आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठ थोपटली आहे. महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर येथील पक्षमुख्यालयात पंतप्रधान भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रात २०१४ च्या अगोदर आम्ही ज्युनियर पार्टनर होतो. १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा आम्ही त्यात सहभागी होतो.

मात्र २०१४ मध्ये जनतेने आम्हाला कौल दिला असला तरी एकत्र येऊन सरकार स्थापन करा, असे आदेश दिले. ते आदेश मानून आम्ही राज्यात सरकार स्थापन केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या ५० वर्षांत कोणतीही एक व्यक्ती सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहात नाही, असा महाराष्ट्राचा इतिहास असताना देवेंद्र फडणवीस सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या राज्यात राजकीय स्थिरता आवश्यक आहे. अगोदरच्या सरकारांकडे स्पष्ट बहुमत असतानाही त्यांनी सलग एक व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसवला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना सोबत घेऊन पाच वर्षे स्थिर आणि भ्रष्टाचारमुक्त शासन दिले, असे मोदी यांनी निक्षून सांगितले.

- Advertisement -

यावेळीही महाराष्ट्राच्या जनतेने भाजपच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवला आहे. फडणवीस यांनी आपल्या सरकारवर एकही डाग न लावता जे सरकार चालवले, त्यावर महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. मी महाराष्ट्रातील जनतेने आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो की, भाजप आगामी पाच वर्षे भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊन, महाराष्ट्र आणि हरयाणाला विकासाच्या मार्गावर येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -