घरताज्या घडामोडीMaharashtra Budget 2022 : राज्यातील समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार, रस्त्यांसाठी 15 हजार...

Maharashtra Budget 2022 : राज्यातील समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार, रस्त्यांसाठी 15 हजार 673 कोटींची तरतूद

Subscribe

महाविकास आघाडी सरकाने राज्यातील रस्त्यांचे विस्तारिकरण करणे आणि रस्त्तांची दुरुस्ती करण्यावर अधिक भर दिला आहे. राज्यातील दळणवळण वाढल्यास आर्थिक क्षमता देखील वाढते यामुळे राज्य सरकारने रस्त्यावर देखील लक्ष्यकेंद्रीत केलं आहे. राज्य सरकारने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग विस्तारित करण्याचे ठरवलं आहे. तर यंदाच्या वर्षात 6 हजार 550 कि.मी लांब रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात रस्त्यांच्या विकासासाठी 15 हजरा 678 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात वाहतूक आणि दळणवळण विकासावर अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यात मेट्रोचे जाळे वाढवण्यावर भर दिला आहे. तसेच जल मार्ग वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय़ घेण्यात आले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 या अंतर्गत सुमारे 7 हजार 500 कोटी रूपये किंमतीच्या 10 हजार कि.मी. लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली असून येत्या 2 वर्षात ही कामे पूर्ण होतील असे अजित पवार म्हणाले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा-3 अंतर्गत एकूण ६ हजार ५५० कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या कामांची सन 2022-23 मध्ये सुरूवात करण्यात येईल.

सागरी महामार्गाबाबत घोषणा

रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग – गेल्यावर्षी अर्थसंकल्प सादर करताना मी रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची घोषणा केली होती. या महामार्गावरील रेवस आणि कारंजा यांना जोडणाऱ्या धरमतर खाडीवरील 2 कि.मी.लांबीच्या 897 कोटी 70 लाख रुपये खर्चाच्या मोठया चौपदरी खाडी पुलाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. या सागरी महामार्गाच्या कामाकरीता सुमारे 1 हजार 100 हेक्टर भूसंपादनासाठी 500 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

- Advertisement -

पुणे रिंगरोड प्रकल्पासाठी 1 हजार 500 कोटी

पुणे-रिंगरोड प्रकल्प-पुणे-रिंगरोड प्रकल्पासाठी सुमारे 1 हजार 900 हेक्टर जमिनीचे संपादन करावयाचे असून त्याकरिता 1 हजार 500 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

समृद्धी महामार्गाचा विस्तार

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग नागपूर ते भंडारा-गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा विस्तारित करण्याचे नियोजन आहे. सदर महामार्गाचे 77 टक्के काम पूर्ण झाले असून जालना ते नांदेड या द्रुतगती जोड महामार्गाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

65 रस्ते विकासांची व 165 पुलांची कामे सुरु करण्यात येणार

हायब्रीड ॲन्युईटी-नाबार्ड सहाय्य- हायब्रीड ॲन्युईटी योजनेतून ८ हजार ६५४ कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या मजबुतीकरण व दर्जोन्नतीच्या कामांपैकी ३ हजार ६७५ कि.मी. लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. त्‍यासाठी 22 हजार 309 कोटी रुपये खर्च झाला आहे. उर्वरीत कामे सन 2022-23 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नाबार्डने मंजूर केलेल्या 65 रस्ते विकासांची व 165 पुलांची कामे सन 2022-23 मध्ये सुरु करण्यात येतील.

आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून रस्तेविकास – आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून 990 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण व दर्जोन्नती करण्यात येत आहे. त्यांची अंदाजित किंमत 5 हजार 689 कोटी रूपये आहे. सन 2022-23 मध्ये 765 कि.मी.लांबीची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासासाठी 15 हजार 673 कोटी रुपये व इमारती बांधकामासाठी 1 हजार 88 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.


हेही वाचा : Maharashtra Budget 2022: कळसूत्री सरकारचा विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -