घरमहाराष्ट्रमराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते करेन -...

मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते करेन – मुख्यमंत्री

Subscribe

कर्नाटकातील बेळगाव येथे मराठी भाषिकांवर कानडीची सक्ती केली जात आहे. त्याप्रकारची सक्ती आम्हाला करायची नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील सर्व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याबाबतच्या विधेयकाला आज विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडले होते. मराठी भाषा सक्तीची केल्यानंतर मराठीला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी सभागृहात केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते सर्व करेन असे आश्वासन दिले.

आज इंग्रजीचे स्तोम माजले आहे. पण लोकमान्य टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा अग्रलेख लिहून इंग्रजांना वठणीवर आणले होते. इंग्रजांना वठणीवर आणायची ताकद मराठी भाषेत आहे. ही भाषा भक्तीची आणि शक्तीची आहे. मात्र आज ती सक्तीची करण्याची वेळ आली आहे. ही वेळ कुणामुळे आली. त्याची चर्चा आज न करता मराठीचा विकास करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

मराठी भाषा सक्तीची केली जात असली तरी त्यातून आम्हाला इतर भाषेचा दुस्वास करायचा नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. ज्याप्रकारे कर्नाटकातील बेळगाव येथे मराठी भाषिकांवर कानडीची सक्ती केली जात आहे. त्याप्रकारची सक्ती आम्हाला करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नसती भानगड नको रे बाबा

मराठी भाषा आणि त्यातील शब्दांची गमंत सांगताना ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्यासमोर अधिकार्‍यांनी फाईल ठेवली आणि या नसतीवर सही करा असे सांगितले. नसती म्हणजे काय? असे विचारल्यावर ते म्हणाले की फाईलला नसती म्हणतात. ही नसती भानगड मला नको, असे त्याच क्षणी मी बोललो. कदाचित फाईलवर सही करुन कुणालाही अंगावर बालंट ओढवून घ्यायचे नसते म्हणूनच कदाचित त्याला नसती हे नाव पडले असावे, अशी शाब्दिक कोटीही ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -