घरमहाराष्ट्रनाशिकसूक्ष्म नियोजनाने संमेलन झाले यशस्वी

सूक्ष्म नियोजनाने संमेलन झाले यशस्वी

Subscribe

संमेलनातून काय शिकायला मिळाले,याविषयी ‘आपलं महानगर’ने आयोजकांच्या भावना जाणून घेण्याचा केला प्रयत्न

नाशिक: कोरोनाचे संकट,निमंत्रित मान्यवर उपस्थित राहतील की नाही याची धास्ती, संमेलनाच्या बदललेल्या तारखा, सुरु असलेले वाद आणि अनपेक्षितपणे वाढलेली गर्दी.. असा संमिश्र अनुभव ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना आला.संमेलनातून काय शिकायला मिळाले,याविषयी ‘आपलं महानगर’ने आयोजकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.एखादी मोठी व्यक्ती सोबत असल्यास नियोजनातील अडथळे कसे दूर होतात आणि इतका मोठा सोहळा निर्दोेषपणे करण्यासाठी कशा स्वरुपाचे सूक्ष्म नियोजन करायला हवे, याचा वास्तूपाठ या साहित्य संमेलनात मिळाल्याचेही आयोजकांनी सांगितले.

नाशिकमध्ये झालेले ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्य आणि समाज यांचा अनुबंध साधणारे ठरले. समकालीन विषयांची चर्चा हे या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. शेतकर्‍यांची दुरुस्थिती, कोरोनानंतरचे अर्थकारण, ऑनलाइन वाचन, समकालीन माध्यमे असे विषय या संमेलनात चर्चिले गेले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने या प्रयत्नात आयोजकांना साथ दिली. त्यातून सांघिकरितीने संमेलन यशस्वी करता येते, असे दिसून आले.साहित्य हे समाजाचा आरसा असतो, असा एक सिद्धांत मांडला जातो. त्याचे प्रात्यक्षिक म्हणजे नाशिकमध्ये झालेले तिसरे अखिल भारतीय संमेलन ठरते. नाशिकमधील लेखकांच्या आठवणी आणि साहित्य यांना उजाळा देणारे हे साहित्य संमेलन ठरले. लक्ष्मीबाई टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर यांच्या साहित्याबरोबरच चंद्रकांत महामिने, रमेश महाले, सुषमा अभ्यंकर यांच्याही आठवणी या संमेलनाने जाग्या केल्या. संमेलन यशस्वी करण्यासाठी कुणालातरी नारायण व्हावे लागते. ती भूमिका जातेगावकर यांनी केली. लोकहितवादी मंडळाने प्रामाणिकपणे प्रयत्न करून संमेलन यशस्वी करण्यात आपला वाटा उचलला. माजी खासदार समीर भुजबळ हे पडद्यावर दिसत नसले तरी त्यांनी आपले व्यवस्थापकीय कौशल्य पणाला लावून संमेलन यशस्वी केले. – प्रा.डॉ. शंकर बोर्‍हाडे, कार्यवाह, मराठी साहित्य संमेलन, नाशिक

नाशिकच्या साहित्य संमेलनातून नियोजन शिकायला मिळाले. साहित्य संमेलनासाठी मुबलक, जागा, दिशादर्शक हॉलची आवश्यकता असल्याने भुजबळ नॉलेज सिटीमध्ये संंमेलन आयोजित केले. त्यात यशस्वी झालो. संमेलनात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनातर्फे अभिजात मराठी दालन साकारण्यात आले होते. तसेच, संमेलनात पहिल्यांदा बालकुमार साहित्य मेळावा, चित्रकला व शिल्प प्रदर्शन आयोजित करता आल्याने साहित्य व कलांचा संगम करता आला. संंमेलनात पहिल्यांदाच शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर आधारित ५० संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले, याचा आनंद आहे. संंमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच रसिकांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय, संंमेलन समारोपानंतर पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समारोप कार्यक्रमानंतर रसिक निघून जातात. पण यंदाच्या साहित्य संंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमास रसिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.  – जयप्रकाश जातेगावकर,प्रमुख कार्यवाह, मराठी साहित्य संमेलन, नाशिक  

ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा अनुभव पाठीशी असल्याने साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी यशस्वी करता आली. साहित्य संमेलनातून संघटन कौशल्य शिकायला मिळाले. चांगले काम केले तर आपोआप चांगले लोक भेटत जातात. कोरोनानंतर नाशिककरांना साहित्य संमेलनात सहभागी होता, आले. संंमेलनात सामान्य माणसेसुद्धा किती मोठी असतात, हे जवळून पाहता आले.
– विनायक रानडे, ग्रंथदिंडी प्रमुख, मराठी साहित्य संमेलन

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -