घरताज्या घडामोडीBDD चा मराठी टक्का कमी होऊ देऊ नका - शरद पवार

BDD चा मराठी टक्का कमी होऊ देऊ नका – शरद पवार

Subscribe

एतिहासिक महत्व असलेल्या बीडीडी चाळी आज ना उद्या जाणार, मोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत. अशावेळी यातील कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका. या बीडीडी चाळीच्या निमित्ताने अतिशय चांगल्या अशा सुविधांचे असे ५०० फुटांचे घर मराठी माणसाला मिळणार आहे. अशावळी आपल्या कष्टाचा ठेवा विकू नका. मराठी टक्का या भागातून घालवू नका. मराठी आवाज यापुढेही दिसला पाहिजे, मराठी आवाज टिकला पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडीडी चाळीच्या पुर्नवसनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मांडली. या बीडीडी चाळीची कष्ट करणारे लोक म्हणून ओळख आहे, ही ओळख पुसली जाता कामा नये असेही आवाहन शरद पवार यांनी केले. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांच्या आवाहनाला साथ देत पिढ्यांची परंपरा तुटू देऊ नका अशी साद घातली. स्वतःची घरे झाल्यावर कोणत्याही मोहाला बळी पडू नका अशीही विनंती त्यांनी यावेळी केली.

मुंबईतल्या गिरण्यांच्या बाबतीत गिरणीचा भोंगा वाजल्यावर त्याठिकाणी कामगार घाम गाळायला जाताना दिसायचा. नंतरच्या काळात त्याठिकाणी भोंगेही बंद झाले आणि गिरण्याही बंद झाला. गिरण्यांच्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या टॉवरमध्ये हा कष्टकरी असा कामगार वर्ग नामशेष होत गेला. बीडीडी चाळीच्या निमित्ताने कष्टकरी वर्गाची आठवण करून देताना शरद पवारांनी मराठी टक्का कमी होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी केले. बीडीडीचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास निर्माण करणाऱ्या लोकांचा आहे. कष्टकरी वर्गाच्या निमित्ताने बीडीडी चाळींचा होणारा पुर्नविकास हा इतिहासात आज सोन्याचा दिवस असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि देशाच्या इतिहासात बीडीडी चाळींच्या योगदानाचा इतिहास मोठा आहे. हा इतिहास जतन करायचा आहे. तसेच देशाला मोठे करायचे आहे. म्हणूनच कष्टाचा ठेवा विकू नका असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात मुंबईतील हुतात्म्यांपैकी बीडीडी चाळीतील हुतात्म्यांचाही समावेश होता. मुंबई मिळवण्यासाठी या हुतात्म्यांनी सांडलेले रक्त हे वाया जाऊ देऊ नका. या चाळी म्हणजे हुतात्म्यांची आठवण आहे. त्यामुळे पिढ्यांची परंपरा तुटू देऊ नका. स्वतःचे घर झाल्यानंतर कोणी कितीही मोहात पाडेल, पण या घरांसाठीच्या मोहाला बळी ठरू नका असेही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. स्वराज्य हा जसा हक्क आहे, तसाच स्वराज्यात स्वतःचे घर असणे हादेखील हक्क असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

इतिहास आणि भविष्य एकत्र आणण्याचा प्रयत्न बीडीडी चाळीच्या माध्यमातून होणार आहे. बीडीडी चाळींना एक मोठा इतिहास आहे. पण त्याचसोबत वरळीतून येत्या दिवसांमध्ये शिवडी कनेक्टर, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प, कोस्टल रोड येथून जातो आहे. त्यापुढे एमटीएचएल हा नवी मुंबई एअरपोर्टला कनेक्ट होणार आहे. त्यामुळेच इतिहास आणि भविष्य एकत्र आणण्याचा प्रयत्न या बीडीडी चाळींच्या प्रकल्पांच्या माध्यमातून होत आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले. बीडीडी चाळींच्या प्रकल्पाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे बोलत होते. येत्या ३६ महिन्यांमध्ये बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या डोळ्यासमोर या इमारती उभ्या राहतील असाही विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईतील बीडीडी चाळी कशा होत्या, चाळ संस्कृती काय होती ? लोक चाळीत कसे राहत होते, हे दाखवून देण्यासाठीच बीडीडी चाळीचे म्युझियम करण्यात येणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -