घरमहाराष्ट्र'एमआयएममुळेच आघाडी फुटली'; प्रकाश आंबेडकरांचा टोला

‘एमआयएममुळेच आघाडी फुटली’; प्रकाश आंबेडकरांचा टोला

Subscribe

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सध्या जागावाटपावरून सुंदोपसुंदी सुरू असून नक्की आघाडी कुणामुळे तुटली? यावर दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या युतीसंदर्भात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीमधल्या सुंदोपसुंदीची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये सध्या वाद सुरू आहे. नक्की आघाडी कुणी तोडली? यावर आता या दोन्ही पक्षांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. एकीकडे इम्तियाज जलील यांनी आघाडी तुटण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना दोषी धरलेलं असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी देखील आघाडी तुटण्यासाठी एमआयएमला दोषी धरलं आहे. ‘एमआयएमनेच वंचित बहुजन आघाडीसोबत जागावाटप करण्यासाठीच्या चर्चेची दारं बंद केली आहेत’, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हा आरोप केला.

टोलवाटोलवी सुरूच!

जागावाटपासंदर्भात दोन्ही बाजूंनी सध्या वेगवेगळे दावे केले जात आहे. एमआयएमकडून आधी ९५, नंतर ८० आणि शेवटी ७२ जागांची मागणी प्रकाश आंबेडकरांकडे करण्यात आली होती. मात्र, त्यांना फक्त आठच जागा सोडण्यावर प्रकाश आंबेडकर ठाम राहिल्यामुळे एमआयएमने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मध्यंतरी इम्तियाज जलील यांनी ‘वंचितसोबत आघाडी होणारच नाही’, अशा आशयाचं वक्तव्य करून चेंडू वंचित आघाडीच्या कोर्टाच टोलवला होता. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी ‘एमआयएमनेच जागावाटपाची चर्चा बंद केली आहे, त्यांनीच ती सुरू करावी’, असं विधान करत तोच चेंडू परतवून लावला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, असं देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अनाकलनीय प्रकाश आंबेडकर!

दुष्काळग्रस्त भागासाठी प्रकल्पाचं आश्वासन!

दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवण्याच्या प्रकल्पाचं देखील आश्वासन दिलं. ‘समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवण्याचा प्रकल्प आपण सत्तेत आल्यावर हाती घेऊ’, असं ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे ‘तापी प्रकल्पात सूरतमार्गे समुद्रात मिळणारं ८० टीएमसी पाणी हे देखील उत्तर महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागात वळवलं, तर तिथल्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल’, असा दावा आंबेडकरांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -