घरमहाराष्ट्रMaharashtra Lockdown 2021: येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन? -विजय वडेट्टीवार

Maharashtra Lockdown 2021: येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन? -विजय वडेट्टीवार

Subscribe

देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने दिल्लीत केलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात देखील कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी कोरोनाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येईल, असे संकेत दिले आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करायचा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री दोन दिवसांत घेतील, अशी माहिती देखील त्यांनी मुंबईत दिली. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अंदाज चुकवला. सगळ्यांना वाटत होते, लाट सौम्य असेल परंतु दुसरी लाट तीव्र निघाली असून याची कोणालाच कल्पना नव्हती, असेही ते म्हटले.

लॉकडाऊन १०० टक्के व्हावा, अशी मागणी

राज्यात संचारबंदी करून त्याचा फायदा सध्या हवा तसा होताना दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसेच इतर लहान दुकाने असणारेही लॉकडाऊन १०० टक्के व्हावा, अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांत देखील नागरिक कडक लॉकडाऊन करा, अशी मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन दोन दिवसांत कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय होईल अशी अपेक्षा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

लवकरच लॉकडाऊची घोषणा

आजच दिल्ली सरकारने आज रात्री १० वाजेपासून एका आठवड्याच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही माहिती घेत आहोत. लॉकडाऊन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. दिल्लीच्या लॉकडाऊनचे स्वरुप नेमके कसे आहे? लोकलसंबंधी कोणता निर्णय घेतला आहे? अत्यावश्यक सेवांसाठी कसे नियम आहे? ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर स्वरुप ठरवून नंतर घोषणा करण्यात येईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -