मनसेचे इंजिन धावणार

५ ऑक्टोबरला पहिली प्रचार सभा,जागांबाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्हच

Raj Thackeray
राज ठाकरे

कोहिनूर मिल-प्रकरणात ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर मौन पाळणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी आपले मौन सोडले. आगामी विधान सभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आजपर्यंत जे काही नाही बोललो, ते सगळे येत्या ५ तारखेपासून सुरू होणार्‍या प्रचारादरम्यान बोलेन, असे सांगत राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दमाने घ्या, असा सल्लाही दिला.

आपल्या पहिल्या प्रचार सभेची जागा ठरलेली नाही, पण लवकरच ही जागा कळवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी सोमवारी एमआयजी क्लब, वांद्रे येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर दहा मिनिटे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेच्या काही उमेदवारांची नावेही जाहीर केली. मंत्रालयात आत्महत्या करणारे धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना मनसेतर्फे पहिली उमेदवारी देण्यात येणार असे राज ठाकरे यांनी जाहीर केले.

यावेळी शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला.ते मनसेकडून निवडणूक लढवणार आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या ईडी चौकशीचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, माझी आणि पवार कटुंबियांमागे ईडीची चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश आहे. ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशी मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही, असे स्पष्टीकरण राज यांनी दिले.

यंदाच्या निवडणुकीत यश मिळेल, असे मला वाटत आहे. माझा आतला आवाज मला तेच सांगतोय, यश नक्की मिळणार, असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न राज यांनी केला आहे.

ईडीच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला नव्हता. विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या मनसे निवडणूक लढविणार की नाही, याबद्दल साशंकता होती. मात्र राज यांच्या आजच्या घोषणेमुळे मनसैनिकांच्या जिवात जीव आला आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी मनसेने वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या.

मनसेची स्ट्रॅटेजी
युती आणि आघाडीतील नाराजांना संधी देऊन काही जागांची चाचपणी करण्याची मनसेची निवडणूक स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळेच आघाडी आणि युतीच्या उमेदवार याद्यांच्या घोषणेकडे मनसेचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या ४ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळेच मनसेने आपली पहिली सभा येत्या ५ ऑक्टोबरला ठेवली आहे.