घरमहाराष्ट्र'NOTA' मागे नोटा हे कारण की, पर्याय नव्हता म्हणून मतदारांनी केली निवड?

‘NOTA’ मागे नोटा हे कारण की, पर्याय नव्हता म्हणून मतदारांनी केली निवड?

Subscribe

मुंबई : गेल्या जूनमध्ये शिवसेनेत मोठी फूट पडल्यापासून विविध राजकीय चर्चा रंगतच आहेत. या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक झाली. ही पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सहज जिंकली. पण ही निवडणूक आणि त्यात ‘नोटा’ला मिळालेली मते ही जास्त चर्चेचा विषय ठरली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे 11 मे 2022 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला. पण भाजपाने ऋतुजा लटके यांच्याविरोधात मुरजी पटेल यांना निवडणूक रिंगणात उतरविले. पण मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलल्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपाने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली.

- Advertisement -

पण ‘नोटा’चे (None of the above) बटण दाबण्याचे आवाहन भाजपाकडून करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काही मतदारांना पैसे देऊन मतदानाच्या वेळी नोटा बटण दाबण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा माजी मंत्री अनिल परब यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या आधीपासूनच नोटाची चर्चा रंगली होती.

विशेष म्हणजे, फेब्रुवारी – मार्चमध्ये गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवेसनेला ‘NOTA’पेक्षाही कमी मते मिळाली होती. गोव्यात शिवसेनेने 10 जागांवर आपले उमेदवार उभे केले असून सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. गोव्यातील चार जागांवर शिवसेनेला 100 पेक्षा कमी मते मिळाली. गोव्यात NOTAला 1.12 टक्के मते मिळाली तर शिवसेनेला 0.18 टक्का मते मिळाली. त्याचप्रमाणे, मणिपूरमध्ये शिवसेनेने सहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते जेथे NOTAला 0.54 टक्का आणि शिवसेनेला फक्त 0.34 टक्का मते मिळाली होती. उत्तर प्रदेशात शिवसेनेला 0.03 टक्का तर नोटाला 0.69 टक्का मते मिळाली.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नोटा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पाच आकडी संख्या पार केली आहे. या निवडणुकीतील विजयी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार 530 मते मिळाली. तर, नोटाला 12 हजार 806 मते मिळाली. टक्केवारी पाहता नोटाला 14.79 टक्के मते मिळाली. भाजपाने नोटाचा प्रचार केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी आज पुन्हा केला. एका बाजूने उमेदवार मागे घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने नोटाचा प्रचार करायचा हे काही योग्य नाही. भाजपने अशा उमेदवाराला पाठींबा द्यायला पाहिजे होता. गोष्ट खटकणारी आहे, असे अनिल परब म्हणाले.

तथापि, भाजपाच्या प्रचारामुळे नोटाच्या मतांचा आकडा वाढला की, लटके यांच्याविरोधात तुल्यबळ पर्यायी उमेदवार नसल्याने मतदारांनी नोटाला पसंती दिली, हे स्पष्ट झालेले नाही. कारण रिंगणातील इतर सहा उमेदवारांपैकी एकानेही मतांची पाच आकडी संख्या गाठलेली नाही. अन्यथा ही निवडणूक थोडीतरी चुरशीची झाली असती. मात्र, नोटाला झालेले मतदान हे भाजपला मिळालेली मते आहेत, असे सूचक वक्तव्य ऋतुजा लटके यांनी केले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -