घरताज्या घडामोडीFlashBack 2019: न्यायालयीन कचाट्यात अडकले मुंबईचे हे प्रकल्प

FlashBack 2019: न्यायालयीन कचाट्यात अडकले मुंबईचे हे प्रकल्प

Subscribe

पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांसाठी यंदाचे वर्ष फारच अडचणीचे ठरले. पर्यावरण की विकास अशा दुहेरी पेचात विकास प्रकल्प अडकून पडले. मुंबईसह राज्यातील विकास प्रकल्पांमध्ये पर्यावरणवाद्यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे ठरले. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये कोर्टाने हस्तक्षेप करत पर्यावरणाच्या बाजूने निकाल दिला. तर काही प्रकरणांत पर्यावरण आणि विकासकामे यांना प्राधान्यक्रमही मंजूर केला.

मुंबईतील मेट्रो प्रकल्पांमध्ये भुयारी आणि एलिव्हेटेड अशा दोन्ही मार्गांच्या कामाला सुरुवात झालेली असली तरीही २०१९ मध्ये सर्वाधिक बोलबाला राहिला तो म्हणजे मुंबई मेट्रो ३ च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गाचा. मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रकल्पांमध्ये मेट्रो ३ च्या आरे कारशेडच्या मुद्यावर जनसामान्यांच्या सडेतोड प्रतिक्रियांपासून ते राजकीय घडामोडींनी हे संपूर्ण प्रकरण खूपच गाजले. आरे कारशेडच्या जागेच्या निमित्ताने दोन वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारमधील भूमिकाही मुंबईकरांनी अनुभवल्या. आरे कारशेडच्या मुद्यावर नागपूर हिवाळी अधिवेशनातही काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयाच्या काम थांबवण्याच्या सूचनेमुळे आता कारशेडच्या कामाला ब्रेक लागला आहे. तर राज्य सरकारने वित्त अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेत समिती नेमली असल्यामुळे आता कारशेडचे प्रकरण राज्य सरकारच्या पातळीवरच निश्चित होणार हे नक्की.

कुलाबा-सीप्झ-वांंद्रे या भुयारी मेट्रो ३ मार्गामध्ये ७२ टक्क्यांंपर्यंत टनेलिंगचे काम झाले आहे. यंदाच्या वर्षात मुंबई मेट्रो ३ ला एक्वा लाईन म्हणून संबोधण्यात आले. मुंबईकरांच्या स्पिरीटला सलाम करत हे नाव मुंबई मेट्रोला देण्यात आले. आता मेट्रो ३ च्या अनेक पॅकेजेमध्ये ब्रेकथ्रूचे काम झाले आहे. तर स्टेशनचे कामही अनेक पॅकेजमध्ये महत्वाच्या टप्प्यावर आहे. कारशेडचे काम वगळता जवळपास सगळ्याच पॅकेजमध्ये काम डेडलाईनमध्ये सुरू आहे. मेट्रो मार्ग ३ साठी कोचेसचे प्रोटोटाईपही यावर्षी समोर आले. तर मेट्रो ३ साठी ट्रेन पुरवणार्‍या अल्स्टॉम इंडियानेही आंध्रप्रदेशात या कोचेसच्या निर्मितीला सुरूवात केली.

- Advertisement -

एलिव्हेटेड मेट्रोच्या प्रकल्पांमध्येही मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गांसाठी सध्या वेगाने काम सुरू आहे. मेट्रोच्या या दोन्ही मार्गावर पिलरचे काम पूर्ण झाले आहे. तर मेट्रो मार्गांसाठीच्या ट्रॅकचा लॉटदेखील मुंबईत दाखल झाला आहे. हे ट्रॅकचे काम मार्च २०२० अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर जून किंवा जुलै महिन्यात या मार्गांवर पहिल्यांदा ट्रायल रन होणे अपेक्षित आहे. या दोन्ही कॉरिडोरवर १५ लाख प्रवासी प्रवास करणे अपेक्षित आहे. ठाणे-वडाळा या मेट्रो ४ प्रकल्पात १ हजार झाडे कापण्यासाठी पर्यावरणवाद्यांच्या आक्षेपानंतर स्थगिती देण्यात आली होती. पण हायकोर्टाने तीन महिन्यानंतर ही स्थगिती उठवत या मार्गावर काम सुरू करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हिरवा कंदील दिला आहे. या मार्गावरही झाडे कापण्याच्या विषयावरून मोठा गोंधळ झाला होता.

एमटीएचएलच्या कामालाही वेग

एमएमआरडीएकडून या प्रकल्पात आतापर्यंत १४ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. कामाच्या सुलभतेच्या अनुषंगाने या संपूर्ण कामाचे विभाजन काही पॅकेजेसमध्ये करण्यात आले आहे. पहिल्या पॅकेजचे काम हे ऑक्टोबर अखेरीस १५ टक्के इतके पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १०.४ किलोमीटरचा ब्रिज बांधण्यात येणार आहे. तर दुसर्‍या पॅकेज अंतर्गत ७.८ किलोमीटरचा ब्रिज बांधण्यात येणार आहे. या पॅकेजअंतर्गत १२ टक्के काम पूर्ण झाले आहे. तिसर्‍या पॅकेजअंतर्गत ३.८ किलोमीटरचा टप्पा आहे. या पॅकेजमध्ये ११ टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएकडून या संपूर्ण प्रकल्पाच्या बांधणीसाठी १७ हजार ८४३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएकडून जिओ टेक्निकल इनव्हेस्टिगेशन आणि कास्टिंग यार्डचे काम आता पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम वेगाने करण्यासाठी अतिरिक्त ५ हजार कामगारांची नेमणूक केली आहे. एमटीएचएल प्रकल्पासाठी आगामी सप्टेंबर २०२२ साठीची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. देशातील पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा अशी शिवसेनेच्या खासदार-आमदारांची भावना होती. याआधी समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचे भाजपने ठरवले होते. मात्र, या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर ओझर्डे ट्रामा केअर सेंटर यंदाच्या वर्षात सुरु झाले. तर पत्री पूल, वर्सोवा-वांद्रे सी लिंक, मुंबई – पुणे मिसिंग लिंकच्या कामाला सुरूवात होणे या वर्षातली सर्वात महत्वाची घडामोड आहे. तर समृद्धी महामार्गाचे बांधकाम आता २२ टक्के पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने कॅबिनेट निर्णय घेतल्यानुसार आता या प्रकल्पातील वित्तीय आराखड्यात बदल झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पात आता सरकारची थेट भांडवली गुंतवणूक असणार आहे. वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल पूर्ण करण्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला यश आले आहे.

भिंवडी -कल्याण शिळफाटा रस्ता क्रॉकिटीकरण ७७३ कोटींचा प्रकल्पही यंदा हाती घेण्यात आला आहे. तर जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ‘झिरो व्हीजन’ चा उपक्रम यंदा हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत १० हजार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. एमएसआरडीसीकडून विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नवीन महाबळेश्वरच्या विकासासाठी नगरविकास खात्यातर्फे अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या संपूर्ण शहर विकासाची जबाबदारी महामंडळांवर आहे. तर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गालगतच्या ७१ गावांचा विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाला सादर करण्यात आला आहे. मोठी जनसुनावणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर हा अहवाल राज्य सरकारकडे दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गावर एमएसआरडीसीचे ४२ टोलनाके आणि सार्वजनिक बांधकामाच्या विभागाच्या ३३ नाक्यांवर यंदा फास्टटॅग लावण्यात आले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -